Sunday, 20 Oct, 8.46 am प्रभात

मुखपृष्ठ
एका शिक्षिकेच्या पगारासाठी 22 शिक्षिकांची वेतनकपात

सातारा - सातारा पालिका शिक्षण मंडळात कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सेमी इंग्लिश माध्यमातील शिक्षिकांना संगनमताने त्रास देण्याचे उद्योग सुरू आहे. सदर बझारमधील एका शिक्षिकेचा पगार देण्यासाठी तब्बल बावीस शिक्षिकांचा निम्मा पगार कापून घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे आधीच वेतन मिळताना सतरा कटकटी, त्यात ऐन दिवाळीत कपातीची टांगती तलवार आणि प्रशासनाचा दबाव यामुळे शिक्षकांची अवस्था तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार अशी झाली आहे.

शिक्षण मंडळाने तत्कालीन उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या काळात पालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्ले ग्रुप व सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू केले होते. त्यावेळी अंगणवाडी मदतनीस प्ले ग्रुप व सेमी इंग्लिश अशा तीन माध्यमांत 17 शाळांसाठी 23 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र पुढे शिक्षण मंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे प्ले ग्रुप बंद करण्याची वेळ येऊन शिक्षकांची संख्या कमी करून 13 वर आणण्यात आली.

या शिक्षिकांना 4500- 6200 असे वेतन देण्यात येते. या कंत्राटी शिक्षकांचे टेंडर गरूडझेप या संस्थेला देण्यात आले आहे. आता सदर बझारमधील तासिका तत्वावर घेण्यात आलेल्या एका शिक्षिकेचा पगार देण्यासाठी अन्य कंत्राटी शिक्षिकांच्या निम्म्या पगारावर कात्री चालवण्याची अफलातून आयडिया प्रशासन अधिकाऱ्यांनी मांडली असून सतत 'होयबा' करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनीसुद्धा त्यात सूर मिसळल्याने शिक्षिकांची अस्वस्थता वाढली आहे. नव्याने रूजू झालेल्या काही शिक्षिकांनी उगाच अडचण नको म्हणून तीन तीन हजार रुपये देऊन टाकल्याचे वृत्त आहे. त्या शिक्षिकेची वार्षिक बिदागी पोहचवण्यासाठी काही मध्यस्थ शिक्षक सक्रिय आहेत. प्रशासन अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी कंत्राटी शिक्षिकांची बैठक घेऊन वेतन कपातीचा फतवा त्यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला.

या कपातीला विरोध केल्यास पुन्हा कामावर घेतले जाणार नाही, अशी तंबी सुध्दा देण्यात आली आहे. एका शिक्षिकेचा वर्षभराचा पगार करण्यासाठी शिक्षिकांच्या पगारावर संक्रात आणण्याची तुघलकी योजना म्हणजे गचाळ कारभाराचा कळस असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. आणि याला सारे शिक्षण मंडळ सामील आहे. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे सातारा पालिका शिक्षण मंडळाचे पदसिद्ध सभापती आहेत. दिवाळीनंतर तरी वेतन कपातीचा गुंता सोडवावा, अशी या शिक्षिकांची मागणी आहे. मात्र, या शिक्षिकांची पालिकेत कोणीच दखल घेत नाही. ज्या शिक्षिका शिक्षण मंडळ प्रशासनाला जाब विचारतात त्यांची लगेच अर्धी रजा मांडली जाते. मी सातारकरांसाठी आहे, असे उदयनराजे म्हणत असले तरी सत्तेतील प्रशासन सातारकरांना कसे नाडते याचे हे ढळढळीत उदाहरण आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top