Eknath Shinde : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, महायुतीच्या जागावाटपामुळे शिवसेनेत नाराजी उफाळून आली आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यानंतर शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
(Eknath Shinde)
रायगडमधील खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत नाराजी जाहीर केली. त्यानंतर जिल्हा संघटक संभाजी जगताप यांच्यासह आणखी एका पदाधिकाऱ्यानेही राजीनामा दिल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. (Eknath Shinde)
महायुतीच्या जागावाटपात रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला असून, या जागेवर अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह अनेक नेत्यांनी तटकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला असला, तरी स्थानिक स्तरावर अनेक शिवसैनिकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
रायगडमध्ये अनेक वर्षे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट राजकीय संघर्ष राहिला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी महायुतीच्या माध्यमातून हातमिळवणी केली असली, तरी कार्यकर्त्यांमधील मतभेद कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, या राजीनाम्यांमुळे विधानपरिषद निवडणुकीत महायुतीसमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रायगडमधील शिवसैनिकांची नाराजी आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Eknath Shinde)

