Dailyhunt
Eknath Shinde : जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाची गरज! कर्मकांडात अडकू नका : एकनाथ शिंदे

Eknath Shinde : जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाची गरज! कर्मकांडात अडकू नका : एकनाथ शिंदे

Eknath Shinde : या जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे. कर्मकांडाच्या जाळ्यात न फसता बुद्धांचे विचार आचरणात आणा. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत बुद्धांच्या तत्वज्ञानाची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

सम्राट अशोक जयंतीचे औचित्य साधून ठाण्यात आयोजित केलेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत शिंदे बोलत होते. या परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार ज्योती वाघमारे आणि महापौर शर्मिला पिंपळोकर उपस्थित होते.

जगभरातून बौद्ध धम्माचा प्रसार करणारे भन्ते या परिषदेसाठी आले होते. या परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे यांना भिक्खू संघाकडून बौद्ध रत्न देऊन गौरवण्यात आले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रतही त्यांना देण्यात आली. यावेळी भिक्खू समाजाकडून एकनाथ शिंदेंना आशीर्वाद देण्यात आला.

शिंदे म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यातील लोकांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केले. भिक्खूंच्या उपस्थितीमुळे ठाण्याची भूमी पावन झाली आहे. जगात शांतता हवी असेल तर बुद्धांचे विचार आवश्यक आहेत. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा.

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत बुद्धांच्या तत्वज्ञानाची गरज आहे. बुद्धांना केवळ मूर्तीत नाही तर विचारात शोधा आणि कर्मकांडात अडकू नका, असे शिंदे म्हणाले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, असे सांगत त्यांनी अभिवादन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat