Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Eknath Shinde : मोठी घडामोड घडणार? एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक

Eknath Shinde : मोठी घडामोड घडणार? एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक

Eknath Shinde : राज्यात आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण (Eknath Shinde) कमालीचे तापले असून, जागावाटप आणि उमेदवारीवरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

जागावाटपाच्या वेळी शिवसेनेने (शिंदे गट) अधिक जागांची मागणी केली होती, मात्र त्यांना केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागल्याने पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मुंबईत एक तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरमधील ५ आमदार आणि १ खासदार उपस्थित राहणार असून, या हायव्होल्टेज बैठकीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

वर्षा बंगल्यावर होणाऱ्या या बैठकीत प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर आणि जागावाटपावरून निर्माण झालेल्या नाराजीवर सखोल खलबते होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मात्र, येथील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शिवसेनेच्या हातून गेल्यानंतर, आता विधानपरिषदेची उमेदवारीही भाजपच्या वाट्याला गेल्याने स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपकडून शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारींवर या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काही आमदारांच्या मते भाजप कडून महायुतीचा धर्म पाळला जात नसून, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपली स्वतंत्र ताकद आणि भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी विधानपरिषदेसाठी दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज हा आहे. अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी आणि पक्षाची होणारी कोंडी टाळण्यासाठी समीर सत्तार यांच्या उमेदवारी अर्जाबाबत एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

या बैठकीत केवळ भाजपविरोधातील नाराजीच नाही, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजीही चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत. यामध्ये प्रामुख्याने मंत्री अब्दुल सत्तार यांची आमदार संजय शिरसाट यांच्यावर असलेली नाराजी, तसेच माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि संजय शिरसाट यांच्यातील जुना राजकीय वाद या मुद्द्यांचा समावेश आहे. या अंतर्गत वादांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मध्यस्थी करून पडदा टाकण्याचा प्रयत्न करतील असे बोलले जात आहे.

या महत्त्वपूर्ण आणि तातडीच्या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेच्या सर्व बड्या नेत्यांना पाचारण करण्यात आले आहे. यामध्ये मंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे, आमदार रमेश बोरनारे आणि माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह काही महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, आमदार प्रदीप जैस्वाल हे सध्या आजारी असल्या कारणाने या बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलावलेली ही बैठक महायुतीचे भवितव्य आणि संभाजीनगरमधील शिवसेनेची पुढील दिशा ठरवण्यासाठी अत्यंत निर्णायक मानली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat