Wednesday, 04 Sep, 11.55 am प्रभात

मुखपृष्ठ
गर्दुल्याकडून महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड

गस्तीवरील महिला पोलिसांचा 'फिल्मी स्टाईल' पाठलाग

देहुरोड - महाविद्यालयातून घरी परतणाऱ्या चार विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या एका गर्दुल्याला गणपती बंदोबस्ताच्या गस्त पथकावर असणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांनी 'फिल्मी स्टाईल' ने त्याचा पाठलाग करीत पकडून चांगलाच चोप दिला. देहुरोड रेल्वे स्थानकाच्या तिकीट घराजवळ मंगळवारी (दि. 3) दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.

बाळू सदामते असे गर्दुल्याचे नाव आहे. पोलीस, घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार महाविद्यालयाहून चार विद्यार्थिनी रेल्वे स्थानकावरून घरी जात होत्या. त्यावेळी तिकीट घराजवळ सदामते या गर्दुल्याने अशल भाषेत शिवीगाळ करीत छेडछाड करताना गर्दुल्यापासून सुटकेसाठी विद्यार्थिनी बाजारपेठेकडे पळत होत्या.

बाजारपेठेत गणपतीच्या बंदोबस्ताच्या गस्तपथकावर असणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचारी कोमल विष्णू आडके, पूजा विलास पालवनकर, अश्‍विनी किसन राठोड यांनी हा प्रकार पाहून तत्काळ गर्दुल्याचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. नागरिकांच्या मदतीने गर्दुल्याला पकडून चांगला चोप दिला. वेळीच पोलिसांची मदत मिळाल्याने विद्यार्थिनींनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले. मात्र विद्यार्थिनींनी फिर्याद न दिल्याने त्याला सोडण्यात आले.

स्थानक परिसरात गस्त वाढवावी

रेल्वे स्थानक आणि परिसरात गर्दुल्यांसह तळीराम, रोडरोमिओ फिरत असतात. त्यांच्याकडून प्रवासी महिला तसेच मुलींची छेडछाड, अश्‍लील भाषेत आरडाओरडा सुरू असते. परिसरात सीआरपीएफ आणि रेल्वे पोलीस फिरकत नाहीत. रेल्वे स्थानक परिसरात लोहमार्ग पोलिसांनी गस्त वाढविण्याचे मागणी परिसरातील नागरिक, महिलांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top