Sunday, 25 Aug, 1.01 am प्रभात

मुख्य बातम्या
ग्रामसभेचा वाद पोलिसांनी मिटविला

वाल्हे - सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंगोरीतील ग्रामसभेबाबतचा वाद अखेर पोलीस ठाण्याच्या दारात जाऊन मिटला. राजकारणापायी काही लोकांनी आख्या ग्रामसभेला वेठीस धरल्याचे या ठिकाणी पाहायला मिळाले. तंटामुक्तीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यासाठी पुढे असल्याने अखेर हा वाद पोलीस ठाण्याला जाऊन मिटला.

पिंगोरी येथील तहकूब ग्रामसभा शुक्रवारी (दि. 23) घेण्यात आली. मात्र, ग्रामसेवकांचा संप सुरू असल्याने सभेला ते येऊ शकले नाहीत. ग्रामसभेचे कामकाज पाहण्यासाठी विस्ताराधिकारी सुद्धा आले होते. मात्र, ग्रामसभेसाठी वेळ सकाळी दहाची असताना कोणी अकरा वाजता तर कोणी बारा वाजता हजर झाले, त्यामुळे गावातील काही तरुणांनी आक्रमक होत ग्रामपंचायतीला टाळे लावण्याचा निर्णय घेतला, त्यातच एका तरुणाने सरपंच आम्हांला कुलूप लावायचंय, तुम्ही बाहेर व्हा, असे सुनावताच सरपंच विद्या यादव निघून गेल्या. त्यानंतर ग्रामपंचायतीने लावलेल्या टाळ्यावर आणखी एक टाळा लावला. दरम्यान, जेजुरीहून चार पोलीस कर्मचारी पिंगोरीत आले.

पोलीस पाटलांनाही संबंधित ग्रामस्थांना घेऊन ग्रामपंचायतीचे टाळे काढण्यासाठी सूचना केल्या. मात्र, ज्यांनी टाळे ठोकले त्यांनी आम्ही टाळे ठोकले नाही, असे सांगितल्याने पोलिसांनी कुलूप तोडले व ग्रामपंचायत कार्यालय खुले करून दिले. त्यानंतर पोलिसांनी मोहन शिंदे यांना तब्यात घेत बाकी सर्वांना जेजुरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले. यानंतर ग्रामपंचायतीला टाळे ठोकणारे सर्व मंडळी खडबडून जागी झाली. संध्याकाळी पाच वाजता सर्वजण पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी अशा प्रकारचे कृत्य पुन्हा करणार नसल्याचे आश्‍वासन संबंधितांनी दिले. त्याचबरोबर सरपंचांनी गावात सलोख्याचे वातावरण राहावे म्हणून आपली तक्रार ही मागे घेतली. त्यामुळे गावच्या ग्रामसभेचा वाद अखेर पोलीस ठाण्यामध्ये मिटला.

राजीनाम्यासाठीच आटापिटा…
पिंगोरी गावच्या सरपंच विद्या यादव सहा महिन्यापूर्वी सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. ग्रामपंचायतीचा कार्यकाल आणखी एक वर्ष उरला आहे. या दरम्यान गावातील दुसऱ्या महिलेला सरपंचपद देण्यासाठी या सरपंचांनी राजीनामा द्यावा, असा त्यांच्यावर दबाव आणण्यात येत आहे. मात्र, यादव यांनी कामकाज सुरू ठेवले आहे, त्यामुळे काही जणांनी हा खटाटोप केल्याचे कारण पुढे येत आहे. गावातील काही ठेकेदारही सरपंच बदलण्यासाठी आग्रही असल्याची माहीती पुढे येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top