Monday, 13 Jul, 4.08 pm प्रभात

ताज्या बातम्या
ग्रामीण पाणीपुरवठ्याची अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करा - पालकमंत्री

जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागात प्रत्येक घराला नळजोडणी

अमरावती : जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे, ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेचा कालावधी दोन वर्षांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठ्याची प्रगतीपथावरील व अपूर्ण कामे तत्काळ पूर्णत्वास न्यावी व जिल्ह्याचा आढावा घेऊन आवश्यक कामांचे प्रस्ताव द्यावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेतील मंजुरी देण्यात आलेल्या प्रगतीपथावरील व अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याकरिता आता या योजनेस दोन वर्षे (सन २०२१-२२ पर्यंत) मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ग्रामीण जनतेला शुध्द व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबवली जाते. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राज्यात सुमारे ६०० कोटी इतक्या किंमतीच्या ७४३ नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, राज्यात ११८ कोटी६३ लाख इतक्या किंमतीच्या ३२ बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. अशा सर्व पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम या योजनेचा कालावधी ३१ मार्च, २०२० रोजी संपुष्टात आला होता. या कार्यक्रमांतर्गत मंजूरी देण्यात आलेल्या प्रगतीपथावरील व अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी या योजनेस दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे.

जल जीवन मिशनमध्ये घरोघर नळ जोडणी

राज्यात केंद्र शासन प्रणित जल जीवन मिशन राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन कार्यान्वयन यंत्रणा म्हणून कार्य करणार आहे, अशी माहिती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली. त्या म्हणाल्या की, राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन २०२४ पर्यंत, वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे.

सध्या राज्यातील एकूण १३२.०३ लक्ष कुटुंबांपैकी ५०.७५ लक्ष कुटुंबांकडे वैयक्तिक नळ जोडणी उपलब्ध आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पुढील चार वर्षात एकुण ८९.२५ लक्ष नळ जोडणी देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा करण्यासाठी बेस लाईन सर्वेक्षण करुन पुढील चार वर्षाचे नियोजन करण्यात येईल. या योजनेसाठी वार्षिक ग्राम कृती आराखडा, जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या स्थितीचा आढावा घेऊन परिपूर्ण आराखडा सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हा स्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कार्यान्वयन यंत्रणा राहणार आहे. ग्राम पातळीवर जल जीवन मिशन अंतर्गत कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती यंत्रणा म्हणून ग्रामीण पाणी व स्वच्छता समिती काम करेल. यामध्ये गाव पातळीवर निर्माण करण्यात येणाऱ्या मूलभूत सोई सुविधांच्या (Infrastructure)१० टक्के इतका निधी लोकवर्गणीद्वारे जमा करण्यात येणार आहे. जल जीवन मिशनसाठी वैकल्पिक आर्थिक मॉडेलच्या माध्यमातून राज्य स्तरावर जल जीवन कोष निधी तयार करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top