Friday, 11 Jun, 2.33 pm प्रभात

ताज्या बातम्या
हे अति झालं राव! गप्पा मारण्याच्या नादात नर्सने एकाच व्यक्तीला दिले करोनाचे दोन्ही डोस

नवी दिल्ली : देशात एकीकडे लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम थांबवण्यात येत आहे. तर आता दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यामध्ये करोना लसीकरण केंद्रावर एक विचित्र घटना घडली आहे. एका व्यक्तीला पाच मिनिटांच्या अंतराने करोनाचा दोन लसी देण्यात आल्या आहेत. ही घटना रावरपुर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर घडली आहे.

बुधवारी रावरपुर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला लसीचे दोन डोस पाच मिनिटांच्या अंतराने देण्यात आले. या व्यक्तीने ही घटना केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचा आरोप केला आहे. लसीकरणासाठी मी गेलो तेव्हा लस देणाऱ्या नर्स एकमेकींशी गप्पा मारत होत्या. त्या गप्पांमध्ये इतक्या व्यस्त झालेल्या की त्यांनी मला पाच मिनिटांमध्ये लसीचे दोन डोस दिले असे या व्यक्तीचे म्हणणे आहे. लसींच्या दोन डोसमध्ये नक्की किती अंतर असावं यासंदर्भात आपल्याला काहीच माहिती नव्हती असा दावाही या व्यक्तीने केला आहे.

लस घेऊन घरी आल्यानंतर आपल्याला अस्वस्थ वाटू लागल्याने आपण करोना लसीकरण केंद्रावर घडलेला प्रकार कुटुंबातील व्यक्तींना सांगितला. त्यानंतर त्याला दोन डोस एकाच वेळी घ्यायचे नव्हते हे समजले. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या व्यक्तीने मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि यासंदर्भात अधिकृतपणे तक्रार नोंदवली.

मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर या व्यक्तीला आप्तकालीन वॉर्डमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी नक्की काय घडलं, यासाठी जबाबदार कोण आहे यासंदर्भातील चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच घडलेल्या चुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताना मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतल्याने काही नुकसान होत नाही, असे स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top