Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हिंदुत्ववादी संघटनांचा निर्धार अन्‌ पोलिसांकडून नोटीसा

हिंदुत्ववादी संघटनांचा निर्धार अन्‌ पोलिसांकडून नोटीसा

प्रभात 6 years ago

पिंपरी - बुधवारी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणतेही कार्यक्रम घेऊ नये म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. तरीदेखील कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, अशा पद्धतीने 35 ठिकाणी आरती आणि मिठाई वाटप करण्याची तयारी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.

अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदू आणि मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठका पोलीस स्टेशन स्तरावर घेण्यात आल्या आहेत. तसेच हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत.

तर काही कार्यकर्त्यांना बोलावून बुधवारी काय कार्यक्रम घेणार, अशी विचारणा केली.

कोणतेही फलक लावू नका, फटाके फोडू नका, महाआरती करू नका, तसेच मिठाई वाटप करू नका, अशा सूचना केल्या आहेत.

पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, आपण व आपल्या हस्तकाकरवी कोणत्या प्रकारची घोषणा, रॅली अथवा ध्वज संचलन करण्यात येऊ नये, तसेच मंदिरांमध्ये आरतीचे आयोजन करु नये. कोविड-19 ने थैमान घातले असून संचारबंदी व जमावबंदीचे आदेश असून पाचपेक्षा जास्त व्यक्‍ती एकत्र येण्यास बंदी आहे.

हिंदुत्ववादी संघटनांनी शहरात 35 मंदिरामध्ये आरती करण्याचे नियोजन केले आहे. त्यानंतर प्रसाद म्हणून लाडू वाटप केले जाणार आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याची व कोणाच्याही भावना दुखावतील अशी कृती करणार नसल्याचीही ग्वाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

रामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पोलीस ठाणे स्तरावर काही जणांना नोटीसही देण्यात आली आहे.
- आर. आर. पाटील, सहायक आयुक्‍त - गुन्हे शाखा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat