Dailyhunt
Honey Bee Attack : लग्नाच्या मांडवात मधमाशांचा हल्ला! नवरा-नवरीसह ९ जण जखमी.. नेमकं काय घडलं?

Honey Bee Attack : लग्नाच्या मांडवात मधमाशांचा हल्ला! नवरा-नवरीसह ९ जण जखमी.. नेमकं काय घडलं?

प्रभात 2 weeks ago

Honey Bee Attack -राजगड तालुक्यातील घिसर गावात लग्नपूर्व हळदी समारंभ आटोपून परत येत असताना मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यात नवरा-नवरीसह नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, घिसर येथील संकेत शिंदे व संध्याराणी धिडले यांचा विवाह सोहळा गुरूवारी (दि. ३०) पार पडणार होता. त्याआधी गावातील जुगाई देवी मंदिरात पारंपरिक हळदी समारंभ पार पडला. सकाळी सुमारे दहा वाजता नवरा-नवरी व नातेवाईक मंदिरात गेले होते.

विधी पूर्ण करून सर्वजण पायवाटेने परतत असताना जंगल परिसरातील झुडपांमध्ये असलेल्या मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि लोकांनी सैरावैरा पळ काढला. या घटनेत सुमारे वीस ते पंचवीस जणांच्या समूहावर मधमाशांनी झडप घातली.

त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या नऊ जणांना लग्नासाठी आलेल्या वाहनांमधून तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती पोलीस पाटील सुनील धिडले यांनी दिली. जखमींमध्ये सहा पुरुष व तीन महिलांचा समावेश असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आवश्यक उपचार करून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत भोईटे यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat