Dailyhunt
HSC Result: बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; शनिवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार

HSC Result: बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; शनिवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार

प्रभात 2 weeks ago

HSC Result: राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल शनिवारी २ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने घोषित करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या कार्यालयात शनिवारी सकाळी ११ वाजता एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत राज्याचा एकूण निकाल, विविध विभागांची टक्केवारी, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी आणि गुणवत्ता यादीची सविस्तर माहिती दिली जाईल.

त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर स्वतःचा आसन क्रमांक (Seat Number) आणि आईचे नाव प्रविष्ट करून निकाल पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला होता, तेव्हापासूनच राज्य मंडळाच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती.

दरम्यान, शिक्षण क्षेत्रातून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई शाळांमधील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना आता तीन भाषा शिकाव्या लागणार आहेत. मात्र, परदेशातून भारतीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या अटीतून सवलत देण्यात आली आहे.

तसेच, पुढील वर्षापासून गणित आणि विज्ञान विषयांसाठी ८० गुणांच्या नियमित परीक्षेव्यतिरिक्त २५ गुणांचा एक अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची विषयातील आकलन क्षमता तपासली जाणार असून, त्याचे गुण मुख्य निकालात समाविष्ट न करता गुणपत्रिकेवर स्वतंत्रपणे नोंदवले जातील, असेही शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat