Sunday, 16 Jun, 10.54 am प्रभात

मुख्य पान
#ICCWorldCup2019 : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय !

मँचेस्टर - भारत विरुद्ध पाकिस्तान या हायहोल्टेज सामना पावसामुळे पुन्हा एकदा खंडित झाला आहे. पावसामुळे सामना थांबवावा लागला त्यावेळी पाकिस्तानची स्थिती ३५ षटकांमध्ये ६ गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावा अशी होती. तत्पूर्वी भारताच्या डावावेळी देखील सामना पावसामुळे थांबवावा लागला होता. दरम्यान डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला आहे.

क्रिकेट विश्वचषकातील मोस्ट अवेटेड सामन्यामध्ये आज भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर ठाकले आहेत. सामन्यामध्ये प्रथम नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. मात्र भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने १४० धावांची दमदार खेळी केल्याने पाकिस्तानचा भारताला फलंदाजीचे आमंत्रण देण्याचा निर्णय साफ फसला. रोहित शर्मा बरोबरच के एल राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी देखील दमदार अर्धशतकी खेळी केल्याने भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३३७ धावांचे मोठे आव्हान उभे केले होते.

प्रतिउत्तरात मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाला भारतीय गोलंदाजांनी चांगलेच जखडून ठेवले. भारतातर्फे विजय शंकरने ५व्या षटकात इमाम उल-हकला पायचीत करत पाकिस्तानला पहिला झटका दिला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आझमने सलामीवीर फकर झमान याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केल्याने भारतीय खेम्यात थोड्यावेळासाठी अस्वस्थता पसरली होती. मात्र अशा अवघड वेळी भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने मैदानात चांगलाच जम बसवलेल्या आझमला २३व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्रिफळाचित करत ही जोडी फोडली. यानंतर कुलदीपने त्याच्या पुढील षटकात फकर झमान याला देखील चालते केल्याने भारताची बाजू आणखीनच भक्कम बनली. यानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पाकिस्तानच्या हाफीज व शोएब मलिक यांना एकाच षटकात तंबूचा रास्ता दाखवत पाकिस्तानी फलंदाजीचे कंबरडे मोडले. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद हा देखील या सामन्यात काही विशेष चमक दाखवू शकला नाही विजय शंकरने त्याला त्रिफळाचित करत पाकिस्तानला सहावा झटका दिला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top