Saturday, 25 Sep, 6.56 pm प्रभात

ताज्या बातम्या
इम्रानखान यांची संयुक्त राष्ट्रांत अमेरिकेवर आगपाखड; विविध विषयांवरून भारतावरही केली टीका

न्युयॉर्क - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेत बोलताना अमेरिकेच्या दुटप्पी भूमिकेवर काल चांगलीच आगपाखड केली. अमेरिकेच्या कृतघ्न पद्धतीच्या स्वभावाचा आम्हाला मोठा फटका बसला आहे अशा शब्दात त्यांनी अमेरिकेवर आगपाखड केली.

इम्रान खान यांचे आधीच रेकॉर्ड करून ठेवण्यात आलेले भाषण तेथे ऐकवण्यात आले. यावेळी त्यांनी अनेक जागतिक समस्यांबरोबरच जगभर सध्या जो इस्लमोफोबिया माजला आहे त्यावरही भाष्य केले. यावेळी त्यांनी भारतावरही जोरदार शब्दात प्रहार करताना भारतातील मोदींचे सरकार म्हणजे हिंदु राष्ट्रवाद्यांचे फॅसिस्ट सरकार आहे अशी टीका केली.

त्यांचा खरा रोख अमेरिकेच्या भूमिकेवर होता. त्यांनी यावेळी नमूद केले की, अमेरिकेने पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांना वाऱ्यावर सोडले आहे. ते म्हणाले की 9/11 ला अमेरिकेवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी दहशतवादाच्या विरोधात जी लढाई सुरू केली होती, त्यात आम्हीही सहभागी झालो होतो. पण त्यातून आमचे मोठे नुकसान झाले असे ते म्हणाले.

अफगाणिस्तानातील संघर्षाचा पाकिस्तानला कसा मोठा फटका बसत गेला याचाही तपशील त्यांनी ऐकवला. अफगाणिस्तानातील कारवाईच्यावेळी ज्या स्थानिकांनी अमेरिकेला मदत केली त्या सर्वांची अमेरिकेने काळजी घ्यायचे ठरवले असल्याचे आम्हाला ऐकिवात आले मग आम्ही अमेरिकेला मदत केली. आमची काळजी कोण घेणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमच्या नशिबी केवळ तोंडी कौतुक आले पण आमची बदनामीच जास्त केली गेली अशी खंतही त्यांनी व्यक्‍त केली.

भारतातील सुमारे 20 कोटी मुस्लिमांच्या स्थितीविषयीही त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. भारतातील मुस्लिमांच्या नशिबी मॉब लिंचिंग, भेदभाव, आणि नागरीकत्व कायद्यातील भेदभाव आला आहे असेहीं त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

काश्‍मीरातील नेते सय्यद अलि गिलानी यांचे अलिकडेच निधन झाले. त्यांच्या मृतदेहांवर त्यांच्या कुटिुींबयांना अंत्यसंस्कार करण्याचाही अधिकार दिला गेला नाही असा आरोप त्यांनी केला. भारताशी आम्हाला सलोख्याचेच संबंध हवे आहेत पण त्या संबंधात विधायक चर्चा सुरू करण्याची जबाबदारी भारताची आहे असे त्यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top