Sunday, 01 Sep, 1.01 am प्रभात

शीर्ष बातम्या
इंदापूर तालुक्‍यात अजूनही 32 हजार नागरिकांची तहान टॅंकरवरच

गोकुळ टांकसाळे
भवानीनगर - ऑगस्ट महिना संपला तरीही इंदापूर तालुक्‍यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने काही गावांमध्ये टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. इतकी भयाण परिस्थिती पिण्याच्या पाण्याची झाली आहे. इंदापूर तालुक्‍यातील बारा गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचे टॅंकर चालू आहेत. एकूण पंधरा टॅंकरद्वारे हे पिण्याचे पाणी गावागावात पोहोच केले जात आहे. सुरवड, वरकुटे खुर्द, लाखेवाडी, वायसेवाडी, झगडेवाडी, वकील वस्ती, लामजेवाडी, गोखळी, व्याहाळी, शेटफळगडे, तरंगवाडी, अकोले, कचरवाडी, निमगाव केतकी, रुई, बावडा परिसरातील वाड्या-वस्त्या, कडबनवाडी, आदी गावांमध्ये टॅंकर सुरू आहेत. अजूनही 32 हजार 819 नागरिकांची तहान टॅंकरवर भागविली जात आहे.

पंचायत समितीतर्फे पाण्याच्या उपलब्धतेनुसार काही बोअरवेल अधिग्रहण केलेल्या आहेत. यामध्ये माळवाडीचे शिंदे, सुभाष दिवसे, बिल्ट ग्राफीक, बावड्याची स्वत:ची पाणीपुरवठा योजना, इंदापूरचे भोंग, बावड्याची बोअरवेल तसेच पिंपरी बुद्रुकचे संजय घोडके, आदी ठिकाणचा समावेश आहे. इंदापूर तालुक्‍यात पाच वर्षांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे काही भागातील पिके पाण्याविना जळून जात आहेत.

आत्तापर्यंतच्या पाहणीद्वारे इंदापूर तालुक्‍यात गेल्या वर्षीही सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. सध्या 425 मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरी पावसापेक्षा खूपच कमी म्हणजे फक्‍त 33 टक्‍के पाऊस पडल्याची नोंद आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून 70 टॅंकरद्वारे पाणी पुरवले जात होते. ते कमी होऊन त्यापैकी 55 टॅंकरद्वारे पाणी पुरवण्यात येत होते. तेही आता फक्त पंधरा टॅंकरद्वारे पाणी काही गावांना पुरवले जात आहे.

इंदापूर तालुक्‍यात पाच वर्ष सरासरीपेक्षा फक्‍त 30 टक्‍केच पाऊस पडत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी पाण्याचाही टंचाई जाणवत आहे. तरीदेखील पंचायत समितीच्या माध्यमातून जी काही मदत पाण्याबाबत जनतेसाठी करता येईल. तेवढी मदत इंदापूर पंचायत समितीच्या माध्यमातून नागरिकांना केली जात आहे.

विनायक गुळवे, गटविकास अधिकारी. इंदापूर.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top