Thursday, 29 Oct, 10.41 pm प्रभात

ताज्या बातम्या
#IPL2020 : राणाची अर्धशतकी खेळी, चेन्नईसमोर 173 धावांचे आव्हान

दुबई - सलामीवीर नितीश राणा याच्या वादळी फलंदाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्सला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 5 गडी गमावून 172 धावांपर्यंत मजल मारता आली.

चेन्नईने नाणेफेक जिंकत कोलकाताला प्रथम फलंदाजी दिली. त्यांचा हा निर्णय कोलकाताच्या सलामीवीरांनी सुरुवातीला चुकीचा ठरवला होता. नितीश राणाने शुभमन गीलच्या साथीत संघाला अर्धशतकी सलामी दिली. त्यावेळी धोनीदेखील आपल्या निर्णयावर नाराज झाला होता. मात्र, अचानक कोलकाताच्या फलंदाजीला अपयशाची बाधा झाली.

गील स्थिरावलेला असताना बाद झाला व काही काळ सामन्याचे चित्र बदलले. त्यानंतर सुनील नरेन व रिंकू सिंग यांनी साफ निराशा केली. त्या दरम्यान राणाने आपले अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार इयान मॉर्गनने राणाला साथ देत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो देखील आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.

यावेळी चेन्नईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणारा राणाही शतकाच्या जवळ आलेला असतानाच बाद झाला. त्याने आपल्या 87 धावांच्या वादळी खेळीत 61 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. राणा बाद झाल्यावर दीनेश कार्तिक व राहुल त्रिपाठी यांनी वेगाने धावा जमवल्या.

या जोडीने संघाला दीडशतकी धावांच्या पुढे मजल मारून दिली. कार्तिक 21 तर त्रिपाठी 3 धावांवर नाबाद राहिले. चेन्नईकडून लुंगी एन्जीडीने 2 गडी बाद केले. कर्ण शर्मा, मिचेल सॅन्टनर व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

कोलकाता नाईट रायडर्स - 20 षटकांत 5 बाद 172 धावा. (शुभमन गील 26, नितीश राणा 87, दीनेश कार्तिक नाबाद 21, राहुल त्रिपाठी नाबाद 3, लुंगी एन्जीडी 2-34, रवींद्र जडेजा 1-20, मिचेल सॅन्टनर 1-30, कर्ण शर्मा 1-35).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top