Friday, 23 Aug, 5.00 am प्रभात

क्रीडा
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा: दुहेरीत भारतीय खेळाडूंची हाराकिरी

श्रीकांत, नेहवाल व सिंधूचे आव्हान कायम

बासेल (स्वित्झर्लंड): भारताच्या कोदम्बी श्रीकांत, साईना नेहवाल व पी.व्ही. सिंधू यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. मात्र दुहेरीत भारताच्या खेळाडूंनी सपशेल निराशा केली.

श्रीकांतने पहिली गेम गमाविल्यानंतर बहारदार खेळ करीत इस्त्रायलच्या मिशा झिलबर्मनचा 13-21, 21-13, 21-16 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये त्याला खेळावर नियंत्रण ठेवता आले नाही मात्र दुसऱ्या गेममध्ये त्याने सर्व्हिस व परतीच्या फटक्‍यांवर नियंत्रण ठेवले आणि विजयश्री खेचून आणली.

महिलांच्या एकेरीत नेहवालने नेदरलॅंडसच्या सोराया एजिबर्गन हिचा 21-10, 21-11 असा दणदणीत पराभव केला. तिने दोन्ही गेम्समध्ये स्मॅशिंगच्या जोरकस फटक्‍यांचा उपयोग केला. तसेच तिने कॉर्नरजवळ प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग केला. विजेतेपदाची दावेदार असलेल्या सिंधूने चीन तैपेईची खेळाडू पेई युपोचे आव्हान 21-14, 21-13 असे सरळ दोन गेम्समध्ये मोडून काढले. तिने ड्रॉपशॉट्‌सचा अप्रतिम खेळ केला. तसेच तिने नेटजवळून प्लेसिंगचाही चतुरस्त्र खेळ केला.

महिलांच्या दुहेरीत जे.मेघना व पूर्विशा राम यांना पहिल्या फेरीतच हार मानावी लागली. जपानच्या शिहो तानाका व कोहारू येनेमोतो यांनी त्यांचा 21-8, 21-18 असा पराभव केला. दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने चांगली लढत दिली. मात्र महत्त्वाच्या क्षणी त्यांना खेळावर नियंत्रण घेता आले नाही. अश्‍विनी पोनप्पा व एन.सिक्की रेड्डी यांचेही आव्हान पहिल्याच फेरीत संपले. चुरशीच्या लढतीत त्यांना चीनच्या दुओ येई व लियिन हुई यांनी 22-20, 21-16 असे पराभूत केले. भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये कौतुकास्पद लढत दिली. मात्र निर्णायक क्षणी त्यांनी केलेल्या चुकांचा चीनच्या खेळाडूंना फायदा झाला.

पुरूषांच्या दुहेरीत मनु अत्री व बी.सुमेध रेड्डी यांना पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला. चीनच्या हान चेंगकाई व झुओ दोंग यांनी त्यांच्यावर 21-16, 21-9 असा विजय मिळविला. श्‍लोक रामचंद्रन व एम. आर. अर्जुन यांनाही पहिल्या फेरीतच हार पत्करावी लागली. त्यांना चीनच्या लिऊ चेंग व लिऊ युचेन यांच्याकडून 14-21, 13-21 असा पराभव स्वीकारावा लागला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top