Thursday, 29 Jul, 10.58 am प्रभात

ठळक बातम्या
जगातील सर्वांत मोठा अभ्यास; लसीमुळे संसर्ग, मृत्यूदर लक्षणीय घटला

पुणे - लष्करी वैद्यकीय सेवेतर्फे (एएफएमएस) देशभरातील भारतीय सशस्त्र दलातील तब्बल 1.59 दशलक्ष आरोग्य सेवक आणि फ्रंटलाइन कामगारांमध्ये लसीकरणाच्या परिणामाबाबतचा अभ्यास करण्यात आला. लसीकरणाच्या प्रभावाबद्दल जगातील हा सर्वांत मोठा अभ्यास असल्याचा दावा संस्थेतर्फे करण्यात आला आहे.

लष्करी वैद्यकीय सेवेतर्फे 'मेडिकल जर्नल आर्मड फोर्सेस इंडिया' या नियतकालिकात याबाबतचा 'कोहर्ट विन-विन' हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासाअंतर्गत संस्थेतर्फे भारतीय सशस्त्र दलातील तब्बल 1.59 दशलक्ष आरोग्य सेवक आणि फ्रंटलाइन कामगारांविषयी सर्वेक्षण करण्यात आले.

'जानेवारीमध्ये कोविशील्ड या लसीद्वारे सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत मेअखेर सशस्त्र दलाच्या 82 टक्‍के लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले. हा संभवतः सर्वात मोठा लस प्रभावीपणाचा अभ्यास आहे आणि सशस्त्र सैन्याने वैद्यकीय सेवांच्या एकापेक्षा अधिक तज्ज्ञांमधील व्यापक कार्यतत्परता या अभ्यासातून दिसून येते.'
- रजत दत्ता, सार्जंट व्हाईस ऍडमिरल, अभ्यासाचे सह-लेखक आणि लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक

अभ्यासादरम्यान आम्ही लसीकरण न झालेले, लसीचा एकच डोस घेतलेले आणि लसीचा दोन्ही डोस घेतलेले नागरिक अशा तीन गटांमध्ये नागरिकांचे निरीक्षण केले. या निरीक्षणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या विश्‍लेषणाच्या आधारे निष्कर्ष मांडण्यात आला आहे. त्यानुसार, संक्रमण कमी करण्यासाठी लस प्रभावीपणा हा 93 टक्‍के आणि मृत्यूदर रोखण्यासाठी लस 98 टक्‍के प्रभावी असल्याचे या अभ्यासात आढळले आहे.
- शंकर सुब्रमण्यन, सहभागी अभ्यासक एअर कमोडोर

मुख्य वैशिष्ट्ये
सशस्त्र दलात 16 जानेवारी 2021 रोजी कोविशील्डसह लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.
30 मे 2021 पर्यंत 95 टक्‍के नागरिकांचे अंशतः आणि 82 टक्‍के नागरिकांचे पूर्णपणे लसीकरण
प्रामुख्याने 27.6 वर्षे वयातील पुरुषांचा सहभाग
1.59 दशलक्ष आरोग्य सेवक आणि फ्रंटलाइन कामगारांचे 135 दिवस निरीक्षण करण्यात आले.
लसीच्या कार्यक्षमतेत सुधार आढळला, संसर्ग प्रमाण 93 टक्‍के, तर मृत्यूच्या प्रमणात 98 टक्‍के घट झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top