Jaismine Lamboria Wins Gold Medal Boxing Womens 57kg Glasgow CWG 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Glasgow CWG 2026) भारतीय बॉक्सरांची सुवर्ण घोडदौड सुरूच आहे.
भारताची विद्यमान जागतिक विजेती महिला बॉक्स जैस्मिन लंबोरिया (Jaismine Lamboria) हिने महिलांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक (Gold Medal) जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात जैस्मिनने गतविजेत्या उत्तर आयर्लंडच्या मिकेला वॉल्श हिचा ५-० असा एकतर्फी पराभव करत भारताला बॉक्सिंगमधील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. तिच्यापूर्वी प्रीती पवारने ५४ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते.
कांस्यचे सुवर्णपदकात केले रूपांतर!
२४ वर्षीय जैस्मिनने बर्मिंघम २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक (Bronze) जिंकले होते. यंदा तिने आपल्या कामगिरीत प्रचंड सुधारणा करत थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. जैस्मिनसाठी ब्रिटनची (UK) भूमी अतिशय लकी ठरली आहे; तिने बर्मिंघम २०२२ मध्ये कांस्य, लिव्हरपूल २०२५ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण आणि आता ग्लास्गो २०२६ मध्ये सुवर्णपदक जिंकून ब्रिटनमध्ये पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे
भारतीय लष्कराची पहिली महिला बॉक्सर अधिकारी –
हरियाणातील भिवानी येथील रहिवासी असलेल्या जैस्मिनला बॉक्सिंगचा वारसा कुटुंबातूनच मिळाला आहे. तिचे पंजोबा (परदादा) हवा सिंह हे आशियाई खेळांचे सुवर्णपदक विजेते आणि भारतीय बॉक्सिंगचे दिग्गज होते. तिचे काका संदीप सिंह आणि परविंदर सिंह यांनी तिला सुरुवातीचे धडे दिले. विशेष म्हणजे, २०२२ मध्ये जैस्मिनची भारतीय लष्कराच्या (Indian Army) मिलिट्री पोलीस कोरमध्ये नायब सूबेदार (Naib Subedar) पदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय सैन्यात सामील होणारी ती देशातील पहिली महिला बॉक्सर अधिकारी आहे.
आज बॉक्सिंगमध्ये अजून तब्बल ८भारतीय बॉक्सर सुवर्णपदकाच्या शर्यतीत उतरणार आहेत. याशिवाय ॲथलेटिक्समध्येही भारताच्या आशा पल्लवित आहेत; १०,००० मीटरमध्ये रौप्य जिंकणारा गुलवीर सिंह ५,००० मीटरच्या फायनलमध्ये धावेल. तसेच ट्रिपल जंपच्या फायनलमध्ये प्रवीण चित्रावेल व सेल्वा प्रभु थिरुमरण, आणि पोल वॉल्टच्या फायनलमध्ये देव मीना व कुलदीप कुमार पदकासाठी शर्थीचे प्रयत्न करतील.

