Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Jayant Patil: ".तर पेट्रोल व डिझेल थेट ७०-८० रुपयात मिळू शकते"; जयंत पाटलांचे खास सल्ला देत फडणविसांना पत्र

Jayant Patil: ".तर पेट्रोल व डिझेल थेट ७०-८० रुपयात मिळू शकते"; जयंत पाटलांचे खास सल्ला देत फडणविसांना पत्र

Jayant Patil : सातत्याने सुरू असलेल्या इंधन दरवाढीनंतर देशभरात संताप व्यक्त करत आंदोलने करण्यात आली. विरोधकांकडून यावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे.

यादरम्यान राज्याचे माजी अर्थमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी, या कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.

याबाबतचे सविस्तर पत्र जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. (Jayant Patil)

जयंत पाटलांनी सोशल मिडीया पोस्टमध्ये म्हटले की, “राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर आकारत असलेला व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात. यामुळे केवळ वाहनधारकांनाच नव्हे, तर वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल. (Jayant Patil)

कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, सलग दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून नागरिकांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे.”

पत्रात नेमकं काय?

आखाती देशातील युद्धामुळे महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड ताण येत आहे. महागाई प्रचंड वाढली आहे, खाद्य तेल, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका थेट सामान्य माणसाला बसत आहे. त्यात भरीस भर पेट्रोल डिझेलचे वाढणारे दर घालत आहेत. केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले जात आहे. आज पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. ( Jayant Patil)

पेट्रोल २ रुपये ६१ पैशांनी तर डिझेल २ रुपये ७१ पैशांनी वाढले आहे. मागील १० दिवसांत सलग चौथ्यांदा ही वाढ केली जात आहे. आज घडीला मुंबईत १११.१२ रू. प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे तर डिझेल ९६.८६ रु. प्रति लिटर मिळत. त्यामुळे या महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या संकटसमयी आपण पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे. (Jayant Patil)

राज्य सरकार इंधनावर व्हॅट आणि सरचार्ज आकारते जे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहे. राज्यात पेट्रोलवर अंदाजे २५% व्हॅट ₹१०.१२ प्रति लिटर सरचार्ज लावला जातो तर डिझेलवर अंदाजे २४% व्हॅट ₹३.०० प्रति लिटर सरचार्ज लावला जातो. राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रद्द करून टाकावा.

यामुळे आज १११ रुपयांना मिळणारे पेट्रोल व डिझेल थेट ७०-८० रुपयात मिळू शकते, असे झाल्यास या कठीण काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. आपण या सुचनेचा सकारात्मक विचार कराल व तात्काळ पेट्रोल डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रद्द करून नागरिकांना दिलासा द्याल अशी अपेक्षा करतो, असे जयंत पाटील यांनी पत्रात लिहिले आहे.

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील कडोळी परिसरात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचा फटका

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat