Dailyhunt
Jhalmuri Recipe: घरी बनवा बंगालची झणझणीत झालमुरी; 5 मिनिटांत तयार होणारी टेस्टी रेसिपी

Jhalmuri Recipe: घरी बनवा बंगालची झणझणीत झालमुरी; 5 मिनिटांत तयार होणारी टेस्टी रेसिपी

Jhalmuri Recipe: बंगालमधील प्रसिद्ध स्ट्रीट फूड झालमुरी (Jhalmuri ) सध्या पुन्हा चर्चेत आलं आहे. हलकं, झणझणीत आणि पटकन तयार होणारं हे स्नॅक सर्व वयोगटातील लोकांना खूप आवडतं. विशेषतः कोलकाता शहराच्या रस्त्यांवर ही डिश मोठ्या प्रमाणात मिळते.

अलीकडेच नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमादरम्यान झालमुरीचा आस्वाद घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर या डिशबद्दल लोकांमध्ये अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकजण ही रेसिपी घरी करून पाहत आहेत. (Jhalmuri Recipe)

झालमुरी बनवणं खूप सोपं आहे आणि यासाठी लागणारे साहित्यही घरात सहज उपलब्ध असतं. यामध्ये मुख्य घटक म्हणजे मुरमुरे (लाह्या), ज्यात विविध भाज्या आणि मसाले मिसळून चवदार स्नॅक तयार केला जातो.

साहित्य: (Jhalmuri Recipe)

२ कप मुरमुरे, १ बारीक चिरलेला कांदा, १ चिरलेला टोमॅटो, १ उकडलेला बटाटा, २ हिरव्या मिरच्या, १ छोटी काकडी, मूठभर शेंगदाणे, १ चमचा मोहरीचं तेल, १ चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर आणि शेव.

बनवण्याची पद्धत:

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात मुरमुरे घ्या. त्यात कांदा, टोमॅटो, बटाटा, काकडी आणि हिरव्या मिरच्या घालून नीट मिक्स करा. त्यानंतर शेंगदाणे घाला, ज्यामुळे कुरकुरीतपणा येतो.

यानंतर मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला घालून सर्व मिश्रण एकत्र करा. शेवटी मोहरीचं तेल आणि लिंबाचा रस टाकून चांगलं हलवा. वरून कोथिंबीर आणि शेव घालून लगेच सर्व्ह करा.

झालमुरी बनवताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती नेहमी खाण्याच्या अगोदरच बनवा. कारण मुरमुरे जास्त वेळ ठेवल्यास मऊ होतात आणि चव कमी होते. तसेच मोहरीचं तेल घातल्याने त्याला खरा बंगाली फ्लेवर येतो.

ही डिश फक्त चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यात फायबरचं प्रमाण चांगलं असल्यामुळे पचन सुधारायला मदत होते. कमी कॅलरी असल्याने वजन नियंत्रणासाठीही हा चांगला पर्याय आहे. तसेच यात कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी उपयोगी ठरतात.

एकंदरीत, झालमुरी (Jhalmuri ) हा झटपट तयार होणारा, चविष्ट आणि हेल्दी स्नॅक आहे. घरच्या घरी सहज बनवता येणारी ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करावी.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat