Wednesday, 20 Nov, 8.20 am प्रभात

मुख्य पान
झेडपी अध्यक्षपदासाठी पतीदेवांची मोर्चेबांधणी!

पुणे - जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (महिला) वर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी 'अध्यक्ष'पदाचा बहुमान कोणत्या महिला सदस्याला मिळणार, याकडे इच्छुकांसह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, अध्यक्षपद आपल्याला मिळावे यासाठी 'महिला सदस्यां'सह त्यांचे 'पतीदेव' यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कोणाला भेटायचे, कोणत्या नेत्यांचा कुठे, कधी दौरा आहे याची माहिती घेण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेचे पहिले अडीच वर्षे अध्यक्षपद मागास प्रवर्गासाठी राखीव होते. त्यावेळी विश्‍वासराव देवकाते यांची निवड करण्यात आली. निवडणुकीमुळे अध्यक्षपदाला मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे आरक्षण सोडतीवर सदस्यांचे लक्ष होते. सध्या अध्यक्षपदासाठी 16 महिला सदस्य इच्छुक असून, सध्याचे अध्यक्षपद बारामती तालुक्‍याला होते. त्यामुळे पुन्हा याच तालुक्‍याला अध्यक्षपद देण्याची शक्‍यता कमी आहे.

इच्छुकांमध्ये आंबेगाव तालुक्‍यातील तुलसी भोर, अरुणा थोरात, शिरूरमधील कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, स्वाती पांचूंदकर, सविता बगाटे, कुसुम मांढरे, हवेलीतून अर्चना कामठे, कल्पना जगताप, पुजा पारगे, अनिता इंगळे, कांचन किर्ती, दौंडमधून महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, मावळमधून शोभा कदम, बारामतीतून रोहिणी तावरे आणि मीनाक्षी तावरे, तर खेडमधून निर्मला पानसरे या शर्यतीमध्ये आहे.

अध्यक्षपद अडीच, की सव्वा वर्षांसाठी?
पुण्याचे महापौरपद एक-एक वर्षासाठी असणार, असे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेतही पुढील अडीच वर्षांत एकच महिला अध्यक्ष होणार, की सव्वा-सव्वा वर्षांसाठी दोन महिलांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळणार? हा सर्वस्वी निर्णय पक्षाकडून घेण्यात येणार आहे. या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top