Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Judge Suicide: दिल्लीत न्यायाधीशांची आत्महत्या; राहत्या घरी आढळला मृतदेह

Judge Suicide: दिल्लीत न्यायाधीशांची आत्महत्या; राहत्या घरी आढळला मृतदेह

प्रभात 3 weeks ago

Judge Suicide: देशाची राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सफदरजंग भागात राहणाऱ्या एका न्यायाधीशाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे विधी आणि न्याय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांचा मृतदेह त्यांच्या घरातील बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. रविवारी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अमन कुमार यांच्या भावाने जेव्हा त्यांना बाथरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत पाहिले, तेव्हा तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कडकडडूमा न्यायालयात होते कार्यरत –

अमन कुमार शर्मा हे सध्या कडकडडूमा न्यायालयात दिल्ली विधी सेवा प्राधिकरणाचे (DLSA) पूर्णवेळ सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कडकडडूमा न्यायालयातील वकील आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली.

शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी –

अमन कुमार शर्मा यांची कारकीर्द अत्यंत उज्ज्वल होती. त्यांनी २०१८ मध्ये पुण्याच्या प्रतिष्ठित सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून बीए एलएलबी (BA LLB) पदवी पूर्ण केली होती. १९ जून २०२१ रोजी त्यांनी दिल्ली न्यायिक सेवेत पदभार स्वीकारला. आपल्या कार्यकाळात त्यांनी विविध दिवाणी आणि फौजदारी खटल्यांमध्ये प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) आणि दिवाणी न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. १८ ऑक्टोबर २०२५ पासून ते ईशान्य जिल्ह्याच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

पोलिस तपास सुरू –

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी ही आत्महत्येची घटना असल्याचे वाटत आहे. घटनास्थळी अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा चिठ्ठी सापडलेली नाही. मात्र, इतक्या कमी वयात आणि जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलिस घेत आहेत.

“आम्ही सर्व बाजूंनी या प्रकरणाची चौकशी करत आहोत. सध्यातरी घातपाताचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, परंतु तपासाअंतीच नेमके कारण स्पष्ट होईल,” असे दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat