Wednesday, 23 Sep, 9.17 pm प्रभात

ताज्या बातम्या
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन

कोल्हापूर - मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सरोज धोंडीराम सुखटणकर (वय 84) यांचे आज निधन झाले. त्यांनी नव्वदहून अधिक मराठी चित्रपट आणि साठहून अधिक नाटकांमध्ये भूमिका साकारली होती. मूळ गाव असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्‍यातील रुई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोल्हापुरातील न्यू भारत नाट्य क्‍लबच्या माध्यमातून त्यांना नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. कोल्हापूरमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रभर त्याकाळी नाटकाचे दौरे केले होते.

त्याकाळी गाजलेल्या 'नर्तकी' या त्यांच्या नाटकाचे 300हून अधिक प्रयोग झाले आहेत. कालांतराने मराठी चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्री म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केलेले आहे.

सुरुवातीला 'वेगळं व्हायचय मला', 'मुंबईची माणसं', 'प्रेम तुझा रंग कसा' अशा अनेक नाटकात भूमिका केल्या. त्यानंतर 'बाई मी भोळी', 'कुंकवाचा करंडा', 'जोतिबाचा नवस', 'सून लाडकी या घरची', 'कौल दे खंडेराया', 'एकटा जीव सदाशिव', 'सोयरिक', 'अष्टविनायक', 'भिंगरी', 'सावज', 'सहकार सम्राट' अशा अनेक मराठी चित्रपटामध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला होता.

त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत दुःख व्यक्त होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top