Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
K. C. Venugopal : जितेंद्र सिंह यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार; काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

K. C. Venugopal : जितेंद्र सिंह यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार; काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

K. C. Venugopal : विद्यार्थ्यांच्या अलिकडील आंदोलनादरम्यान कोणताही गोळीबार झाला नाही असे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल(K. C. Venugopal) यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची नोटीस सादर केली आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहाची दिशाभूल करत जाणूनबुजून खोटी माहिती दिल्याचा आरोप वेणुगोपाल यांनी केला आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलेल्या पत्रात वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनी नमूद केले की, २९ जुलै रोजी सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारास प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, २०२६ वर चर्चा सुरू असताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना हक्कभंगाचा मुद्दा उपस्थित करायचा आहे.

सभागृहात उत्तर देताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, दुसरे म्हणजे, कोणताही गोळीबार झालेला नाही, केवळ अश्रूधुराचा वापर करण्यात आला होता, हे वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गोळीबार झालाच नाही, तर आदेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनी दावा केला की, केंद्रीय मंत्र्यांचे हे विधान प्रत्यक्ष वस्तुस्थितीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. मंत्र्यांच्या दाव्याच्या उलट, तेथे गोळीबार झाला होता. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीवर अजूनही वैद्यकीय उपचार सुरू असून त्याबाबतची माहिती सार्वजनिक व्यासपीठावर उपलब्ध आहे. सभागृहात गोळीबार झाला नाही असा खोटा दावा करून मंत्र्यांनी संसदेला जाणूनबुजून चुकीची माहिती दिली असून सभागृहाची दिशाभूल केली आहे.

सभागृहाची दिशाभूल करणे हा हक्कभंग आणि सभागृहाचा अवमान मानला जातो. देशाच्या सर्वोच्च विधिमंडळात कोणतीही माहिती नोंदवण्यापूर्वी मंत्र्याने तथ्यांची पडताळणी करणे अपेक्षित असते. त्यामुळे मंत्र्यांविरोधात हक्कभंगाची कारवाई सुरू करावी आणि हे प्रकरण सखोल चौकशी व आवश्यक कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे वर्ग करावे, अशी विनंती त्यांनी (K. C. Venugopal) लोकसभा अध्यक्षांना केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat