Monday, 30 Mar, 5.48 am प्रभात

ताज्या बातम्या
कामगारांना स्थलांतरित होण्यापासून रोखावे

नवी दिल्ली - 'कोविड-19′ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या संकटकालीन आणि तणावाच्या घडीला कर्मचारी आणि कामगार यांची संपूर्ण काळजी घेण्याचा सल्ला केंद्रीय रेल्वे तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी उद्योग आणि व्यापारी संघटनांना दिला आहे. करोनाच्या प्रसाराचे आणि देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे व्यापारी जगतावर होत असलेले परिणाम जाणून घेऊन देशभरातील उत्पादन तसेच औद्योगिक क्षेत्रातील संघटना आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींचे अनुभव आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांच्याकडून येणाऱ्या सूचना समजून घेण्यासाठी आज नवी दिल्ली इथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

कामगार हे उद्योग जगताची मौलिक मालमत्ता तसेच साधनसंपत्ती आहेतच. पण या जागतिक साथीच्या दिवसांत त्यांना मोठ्या जमावाने देशभरात कुठेही किंवा ग्रामीण भागात फिरू दिले तर ते करोना विषाणू संसर्गासाठीचे वाहक होणे शक्‍य आहे. म्हणूनच त्यांना नोकरीवरून काढून टाकणे किंवा स्वच्छेने नोकरी सोडून जाऊ देणे, धोकादायक आहे असे ते म्हणाले. विविध धार्मिक नेत्यांसह समाजावर प्रभाव पाडू शकणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून आरोग्यविषयक सावधगिरीच्या उपायांचा प्रसार करावा अशा अपेक्षा त्यांनी उपस्थित प्रतिनिधींकडून व्यक्त केली.

केंद्र सरकारने कोणत्याही वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध आणलेले नाहीत हे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकातून स्पष्ट झाले आहे. करोनाला रोखण्याबाबतची सर्व खबरदारी घेऊन अत्यावश्‍यक सेवा आणि सुविधा सुरू राहतील, असे गोयल यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीमुळे तणावाखाली वावरत असलेल्या कर्मचारी आणि कामगार वर्गाला दिलासा देण्यासाठी काही उद्योगांनी हाती घेतलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

तसेच समाजसेवा म्हणून व्हेंटिलेटर्स सारख्या सध्या अत्यावश्‍यक असलेल्या साधनांची निर्मिती आणि गरजू लोकांसाठी अन्न पुरविण्यासारख्या प्रयत्नांना दाद दिली.
सर्व उद्योजकांनी त्यांच्याकडे कार्यरत कामगारांना आणि मजुरांना आहेत त्याच ठिकाणी वेतन देऊन थांबवून ठेवावे. त्यांनी स्थलांतर करायला सुरुवात केली तर देशातील संपूर्ण बंदीचा उद्देश विफल होईल आणि करोनाच्या संसर्गाचे संकट टळल्यानंतर देशाला सावरायलाही वेळ लागेल असा इशारा या बैठकीला उपस्थित रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top