Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Kamshet News : कामशेत-पवनानगर रस्त्यावर कचऱ्याच साम्राज्य; 'या' तीन परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे हैराण

Kamshet News : कामशेत-पवनानगर रस्त्यावर कचऱ्याच साम्राज्य; 'या' तीन परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे हैराण

प्रभात 2 weeks ago

Kamshet News - कामशेत-पवनानगर रोड परिसरात सध्या कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे येवलेवाडी, दौडे कॉलनी तसेच चित्तोडिया नगर परिसरातील नागरिक या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत.

रस्त्यालगत आणि ओढ्याच्या काठावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये नियमित कचरा संकलनाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे काही रहिवासी थेट रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार आणि इतर वाहनधारकही या परिसरात कचरा फेकत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. परिणामी रस्त्यालगत मोठमोठे कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले असून परिसराचे विद्रूपीकरण होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ओढ्यालगतच्या भागात चिकन व्यवसाय, हॉटेल व्यवसाय तसेच इतर व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात ओला कचरा आणि उरलेले खाद्यपदार्थ टाकले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अन्नाच्या शोधात कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. परिसरातील नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या असूनही कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही वेळा कचरा हटविण्याची मोहीम राबवली जाते; मात्र काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचत असल्याचे चित्र आहे. विशेषतः चित्तोडिया नगर परिसरातील काही नागरिकांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे.

“कामशेत-पवनानगर रोडच्या कडेला टाकण्यात आलेला कचरा हा कुसगाव खुर्द व कामशेत ग्रामपंचायत हद्दीत येतो. संबंधित ग्रामपंचायतींनी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. मात्र, येथे कोणतीही कारवाई होत नसल्याने कचरा टाकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.”
– कांताराम येवले, स्थानिक नागरिक

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat