Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Kamshet : समाधानकारक पावसामुळे भातलागवड अंतिम टप्प्यात

Kamshet : समाधानकारक पावसामुळे भातलागवड अंतिम टप्प्यात

प्रभात 3 weeks ago

वनानगर-कामशेत - मावळ तालुका हा पुणे जिल्ह्यातील प्रमुख भात उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. दरवर्षी खरीप हंगामात हजारो हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. यंदा मान्सूनच्या सुरुवातीला पावसाने काहीसा ताण दिल्याने लागवड उशिरा सुरू झाली होती.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.

मात्र ८ ते २० जुलैदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने परिस्थिती पूर्णपणे बदलली. भातखाचरांमध्ये मुबलक पाणी साचल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात लागवडीची कामे सुरू केली.

मावळातील हवामान आणि भौगोलिक परिस्थिती भात पिकासाठी अनुकूल असल्याने येथे विविध पारंपरिक तसेच सुधारित वाणांची लागवड केली जाते. इंद्रायणी, आंबेमोहोर, साळ आणि कोलम या पारंपरिक आणि सुगंधी वाणांबरोबरच कोकणी, पार्वती, फुलेसमृद्धी, बासमती, रूपाली, रत्ना, महाराष्ट्र सुवर्ण, सोनम, सुरची, वैभव आणि युरी या सुधारित वाणांनाही यंदा चांगली मागणी आहे. उत्पादन वाढ आणि गुणवत्तेच्या दृष्टीने अनेक शेतकरी सुधारित वाणांकडे वळत असल्याचे चित्र आहे.

पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचाही वापर वाढू लागला आहे. चारसूत्री पद्धत, पट्टा पद्धत, एसआरटी तंत्रज्ञान आणि यंत्राद्वारे भातलागवड यांचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना सुधारित पद्धतींचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जात आहे.

मावळ तालुक्यात खरीप हंगामात सुमारे १२,५०० ते १३,००० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. त्यापैकी चारसूत्री पद्धतीने सुमारे ४,००० ते ५,००० हेक्टर, एसआरटी पद्धतीने सुमारे ५० हेक्टर, यंत्राद्वारे १०० हेक्टर, पट्टा पद्धतीने १० हेक्टर क्षेत्रावर लागवड होत असून उर्वरित क्षेत्रावर पारंपरिक पद्धतीने भातलागवड केली जात आहे.

यावर्षी भात लागवडीच्या सुरुवातीला युरिया खताचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खतासाठी धावपळ करावी लागली.

मात्र कृषी विभागाने वेळेत खताचा पुरवठा उपलब्ध करून दिल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. विशेषतः पवनमावळ परिसरात लागवडीनंतर युरिया ब्रिकेट खताचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. या पद्धतीमुळे खताचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी चिंतेत
यंदा समाधानकारक पावसामुळे भातलागवडीला वेग आला असला, तरी मजुरांच्या तीव्र टंचाईने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. मजुरांना चांगली मजुरी, जेवण, चहा आणि ने-आणची व्यवस्था करूनही अपेक्षित संख्येने मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची लागवड उशिरा झाली. काहींनी शेतीचे क्षेत्र कमी केले, तर काहींनी शेती वाट्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामीण भागातील अनेक मजूर आता उद्योग, कारखाने, गोदामे, बांधकाम क्षेत्र आणि इतर व्यवसायांकडे वळल्याने शेतीसाठी उपलब्ध मनुष्यबळ कमी झाले आहे. त्याचबरोबर पॉलिहाऊस, शेडनेट, फळबागा आणि भाजीपाला शेतीमुळे वर्षभर मजुरांची मागणी वाढली आहे. कायमस्वरूपी सालगडी मजूरही मिळणे कठीण झाले असून, वर्षभर रोजगार आणि विविध सुविधा देऊनही अनेक मजूर शेतीत काम करण्यास तयार नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

‘सध्या पोषक पाऊस पडत असल्यामुळे भातलागवडीच्या कामांना वेग आला आहे. चारसूत्री, एसआरटी, यंत्राद्वारे तसेच पारंपरिक पद्धतीने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. तसेच भात, सोयाबीन आणि भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांनी १० ऑगस्टपूर्वी पीकविमा योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा.’- विकास गोसावी, सहाय्यक कृषी अधिकारी

‘सुरुवातीला खताचा तुटवडा असला तरी नंतर पुरेसा पुरवठा झाल्याने अडचण दूर झाली. सध्या अनुकूल हवामान, पुरेसा पाऊस आणि योग्य व्यवस्थापनामुळे यंदा भाताचे भरघोस उत्पादन होईल, असा विश्वास आहे.’ – नलिनी गायकवाड, महिला शेतकरी

Dr. Shailesh Pagaria: शिक्षणातून चारित्र्य घडविणाऱ्या कार्याला कौशल्य पुरस्काराचा सन्मान!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat