Saturday, 19 Sep, 9.09 am प्रभात

मुख्य बातम्या
कराड शहरात लॉकडाऊनची मागणी

कराड - गेल्या महिनाभरात कराड तालुक्‍यासह शहरातील करोना बाधितांचा आकडा वाढतच निघाला आहे. त्यामुळे शहरवासीयांत कमालीची भीती पसरली आहे. त्यामुळे कराडशहर लॉकडाऊन करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, शहरातील सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षही करोना महामारीच्या काळात बाधितांच्या मदतीला धावून आले आहेत.

कराड तालूक्‍यात शुक्रवारी 246 बाधिताची वाढ झाली असून तालूक्‍याचा आकडा सहा हजार झाला आहे. गेल्या 17 दिवसात जिल्ह्यात ऍन्टीजन टेस्टमध्ये 6325 जणांचे अहवाल बाधित आले आहेत. तर विविध लॅबमधील अहवालात 7268 जण बाधित आले आहेत. ही वाढती संख्या प्रशासनासाठी डोखेदुखीचा विषय बनली आहे.

कराड तालुक्‍यात तांबवे म्हारूगडेवाडीतून सुरू झालेला करोना प्रवास काही केल्या थांबण्याचे नाव घेईना. ही साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील सर्व प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत. वाढता करोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता शहरातील व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूचा प्रयोग केला. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
लगतचे मलकापूर शहरासह सैदापूर तसेच अन्य गावांनी पुन्हा लॉकडाऊनचे हत्यार उपसले आहे. उपनगरातून त्याला उंदड असा प्रतिसाद मिळत आहे. मलकापूर तर पुर्णतः बंद आहे. मात्र, काही केल्या कराड शहरातील गर्दीवर नियंत्रण आलेले नाही.

मलकापूरमधील बंद यशस्वी करण्यासाठी येथील पालिकेने पुकारलेल्या बंदमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले आहेत. त्याच पध्दतीने सैदापूरनेही चांगल्या पध्दतीने बंदचे नियोजन केले आहे. वाढती करोनाची साखळी तोडण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरत असल्याचे मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे यांनी सांगितले.
मार्च महिन्यात ज्या पध्दतीने लोकांना जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊनला प्रतिसाद दिला त्या पध्दतीचा प्रतिसाद देण्याच्या मासिकतेत लोक दिसत नाहीत.

लॉकडाऊन करून काय होणार फिरणारे फिरतच राहणार अशा पध्दतीचा सूर नागरिकात आहे. मात्र, कराड शहरातील वाढता करोना प्रार्दुभाव बाजारपेठ, भाजी मंडई होत असलेली गर्दी, लक्षात घेता करोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शहरवासीयातून लॉकडाऊन करण्याची मागणी जोर धरत आहे.

गरज 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानाची
करोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या खेळात अनेकजण बरे होत आहेत तर अनेकांचा मृत्यू होत आहे. यात करोनाने वयोवृध्द असलेल्या तसेच तरूणांनाही सोडलेले नाही. यासाठी शासनाने नुकतेच 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या अभिनव अभियानाची सध्या प्रचंड गरज आहे. आपल्यावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे, याचे भान ठेऊन स्वतःची काळजी घेण्याबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची नितांत गरज आहे. यासाठी हे अभियान निश्‍चित उपयुक्‍त ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top