Thursday, 22 Apr, 9.40 pm प्रभात

ताज्या बातम्या
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताला मदतीची चीनची तयारी

बीजिंग - करोनाचा उद्रेक रोखण्यासाठी भारताला मदत आणि वैद्यकीय पुरवठा करण्यास तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. भारतात करोना विषाणूच्या साथीची दुसरी लाट सध्या सुरू आहे. त्यामुळे भारतातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येतो आहे. म्हणून भारताला आवश्‍यक ती मदत देण्याची तयारी चीनने दर्शवली आहे.

भारतातील दैनंदिन कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आज दिवसभरात भारतात करोनाचा संसर्ग झालेल्या 3 लाख 14 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. करोनाची साथ गेल्या वर्षी सुरू झाल्यापासून कोणत्याही देशात एकाच दिवसात सापडणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत हा आकडा सर्वाधिक आहे, तर देशभरात या रोगामुळे एकाच दिवसात मरण पवणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढून 2,104 झाली आहे.

देशभरात आतापर्यंत 1 कोटी 60 लाख जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये केवळ अमेरिकेत 5 कोटी 20 लाख जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे, असे अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या निरीक्षक गटाने म्हटले आहे. ही परिस्थिती पहिल्या लाटेपेक्षा अधिक भीषण असल्याने चीनने भारतापुढे मदतीचा हात केला आहे. चीन भारताला मदत करण्यास तयार आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍तेवांग वेनबिन म्हणाले.

कोविड-19 ची साथ ही सर्व मानवजातीची समान शत्रू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने साथीच्या विरुद्ध लढा देण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे, असे वांग म्हणाले. भारतातील परिस्थिती अधिक बिकट असून, वैद्यकीय सुविधा आणि प्रादुर्भावाच्या नियंत्रणाच्या उपायांची तात्पुरती टंचाई निर्माण झाली आहे. आम्ही भारताला आवश्‍यक ती मदत करण्यास तयार आहोत. त्यामुळे भारताला साथीवर नियंत्रण आणता येऊ शकेल, असे वांग म्हणाले. मात्र, भारताला मदत देण्याची तयारी असल्याचे चीनने भारत सरकारकडे कळवले असल्याची अधिकृत खातरजमा केली जाऊ शकली नाही.

गेल्या वर्षी करोनाची पहिली लाट तीव्र प्रमाणात असताना चीनला वैद्यकीय साहित्यात मदत करणाऱ्या देशांमध्ये भारत होता. त्यावेळी भारताने चीनला सुमारे 2.11 कोटी रुपये किमतीचे मास्क, हातमोजे आणि आपत्कालीन वैद्यकीय उपकरण असलेले 15 टन वैद्यकीय साहित्य पुरवले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top