Monday, 30 Mar, 6.16 am प्रभात

ताज्या बातम्या
करोना विरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा सुरू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

परराज्यातील कामगार, कष्टकरी यांची पूर्ण काळजी घेणार

मुंबई - जीवनावश्‍यक वस्तू आणि औषधांचा मुबलक साठा असून अत्यावश्‍यक सेवा असलेली दुकाने बंद नाहीत. तरी विनाकारण काही लोक बाहेर पडत पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. कृपया असे करू नका, घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही गर्दी थांबवा, कठोर पावले टाकायला भाग पाडू नका, असा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, आजपर्यंत राज्यातील सर्व जनतेने संयमाचे अतुलनीय दर्शन घडवले आहे. ते पुढेही काही दिवस कायम ठेवत घरात राहा. विरंगुळ्याचे,

कुटुंबियांसमवेतचे क्षण अनुभवा आणि राज्याला सहकार्य करावे. तसेच इतर राज्यातून आलेले लोक, कामगार घरी जाण्यासाठी परत निघाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर दिसत आहे. त्यांना विनंती आहे की, त्यांनी आहेत तिथेच थांबावे, शासनाने त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. राज्यभर त्यांच्यासाठी 163 केंद्रे सुरु झाली असून तिथे त्यांची राहण्याची आणि मोफत जेवण्याची सोय केली आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील जे लोक इतर राज्यात अडकले असतील त्यांनीही तिथेच राहावे. अडचण आल्यास मुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संपर्क करावा. त्यांना संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मदत उपलब्ध करून दिली जाईल. कामगारांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली पाहिजे हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी जीवनावश्‍यक वस्तू, औषध दुकाने आणि सेवा बंद केल्या नसल्याचा पुनरुच्चार केला. यासाठी होणारी गर्दी कमी करावी, यंत्रणेवरचा ताण वाढवू नये, असे आवाहनही केले.

राज्यात चाचणी केंद्रे वाढली

राज्यात चाचणी केंद्रे वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे करोना पॉझीटिव्हची संख्या वाढेल ही अपेक्षा आहेच. परंतू अपेक्षेपलीकडे ही संख्या जाता कामा नये. याशिवाय बरेच रुग्ण बरे होऊन घरी परत जात आहेत ही समाधानाची बाब आहे. खासगी डॉक्‍टरांनीही आपले दवाखाने बंद न करता त्यांच्याकडे येणाऱ्या या तसेच न्यूमोनियाची लक्षणे असलेल्या रुग्णांना सरकारी दवाखान्यात पाठवावे. कारण लक्षणाची तीव्रता कमी असतानाच आपण त्यावर विजय मिळवू शकतो, असे त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top