Monday, 16 Mar, 2.37 pm प्रभात

मुखपृष्ठ
करोनाच्या धसक्याने आरबीआय घेणार 'हा' मोठा निर्णय?

उद्योग व शेअर बाजारावरील परिणाम कमी करण्याचा प्रयत्न

पुणे - करोना व्हायरसचा उद्योग आणि शेअर बाजारावरील परिणाम कमी करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रिझर्व बॅंकही भांडवल सुलभता वाढविण्याच्या आणि व्याजदर कपातीच्या शक्‍यतेवर विचार करत आहे. आज रिझर्व्ह बॅंकेने चार वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी भांडवल सुलभता आणि व्याजदर कपातीबाबत मोठे निर्णय जाहीर होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बॅंक आणि जपानच्या बॅंकेने गेल्या आठवड्यात व्याजदरात मोठी कपात केली आहे.

याबाबत काही विश्‍लेषकांनी सांगितले की, पुढील दोन आठवड्यात रिझर्व्ह बँक व्याजदरात तब्बल 1 टक्‍क्‍यांची कपात करू शकते. बॅंका, बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांमध्ये भांडवल सुलभता निर्माण करण्याची गरज आहे. जर रिझर्व्ह बॅंकेने हा निर्णय घेतला तर उद्योग क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शेअरबाजारात होणारी निर्देशांकाची एकतर्फी घसरण थांबण्यास मदत होणार आहे. गेल्या एक महिन्यात गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपयाचे नुकसान झाले आहे.

रिझर्व्ह बॅंकेने शेअर बाजार कामकाज संपल्यानंतर पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यामुळे व्याजदर कपात तातडीने जाहीर होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षात रिझर्व्ह बॅंकेचे पुढील पतधोरण ३ एप्रिल रोजी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता रिझर्व्ह बॅंकेला लवकरच निर्णय घ्यावा लागेल, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. महागाई थोडी कमी झाली आहे. त्याचबरोबर जागतिक क्रूड बाजारात क्रूडचे दर निम्म्याने कमी झाले असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेला व्याजदरात कपात करण्यास वाव असल्याचेही विश्‍लेषकांना वाटते. काही विश्‍लेषकांनी सांगितले की ३ एप्रिल किंवा त्या अगोदर रिझर्व्ह बॅंक व्याजदरात किमान पाव टक्के कपात करू शकते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top