Friday, 03 Jul, 2.43 pm प्रभात

ताज्या बातम्या
कसा करावा 'वीरभद्रासन' ?

हे दंडस्थितील आसन आहे. आसनस्थिती साधारण वीरभद्रासन 1 प्रमाणेच आहे. सुरुवातीला ताठ उभे राहावे. श्‍वसन संथगतीने करावे. हळूहळू पायातील अंतर वाढवावे. दोन्ही पायात साधारण अडीच ते तीन फुटांचे अंतर ठेवावे.

उजवे पाऊल उजव्या बाजूला वळवावे. उजव्या पायाच्या गुडघ्यापाशी मांडी व पोटरीमध्ये काटकोन होईल एवढ्या प्रमाणात तो गुडघ्यात वाकवावा. उजवी मांडी जमिनीला समांतर ठेवावी. डावा पाय ताठ असावा. हळूहळू दोन्ही हात जमिनीला समांतर येतील याप्रमाणे वर घ्यावेत. हात ताठ ठेवावेत. त्यानंतर, चित्रात दाखविल्याप्रमाणे उजवा हात वरच्या दिशेला घ्यावा व डावा हात मांडीवर ठेवावा. मान व नजर वरच्या दिशेला वरच्या हाताकडे स्थिर असावी.

श्‍वसन संथ असावे. सहजपणे थांबता येईल, तेवढाच वेळ आसनस्थिती टिकवावी. खूप ओढूनताणून करू नये. आसन सावकाश उलटक्रमाने सोडावे. दुसऱ्या बाजूनेही अशाच पद्धतीने ते करावे.

या आसनामुळे खांदे, दंड, पाठ, मांडीच्या स्नायूंची ताकद व लवचिकता वाढते. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. अस्थमाचा त्रास कमी होतो. आत्मविश्‍वास वाढतो. गुडघेदुखी किंवा कुठलीही शस्त्रक्रिया, जुनी दुखणी असणाऱ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आसन करावे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top