Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Kirti Kulhari : अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला तब्बल 'इतक्या' लाखांचा चुना; कीर्ती कुल्हारी फसली चोरट्यांच्या जाळ्यात

Kirti Kulhari : अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला तब्बल 'इतक्या' लाखांचा चुना; कीर्ती कुल्हारी फसली चोरट्यांच्या जाळ्यात

Kirti Kulhari : डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या युगात सायबर गुन्हेगार किती चलाख झाले आहेत, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री कीर्ती कुल्हारी यांच्याच क्रेडिट कार्डवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारत अवघ्या काही मिनिटांत ₹२,४३,८५२ इतकी रक्कम लंपास केली.

विशेष म्हणजे, कार्डचा पासवर्ड कोणाशीही शेअर केला नसतानाही अज्ञात हॅकर्सनी त्यांच्या मोबाईल आणि क्रेडिट कार्डमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर आंबोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, अभिनेत्री कीर्ती कुल्हारी या अंधेरीतील वर्सोवा परिसरात वास्तव्यास असून अभिनय आणि चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घटनेच्या दिवशी त्या अंधेरी पश्चिम येथील फन रिपब्लिक मॉलजवळील सिनेपोलिस थिएटरमध्ये असताना त्यांच्या मोबाईलवर परदेशातून झालेल्या संशयास्पद व्यवहाराबाबतचा संदेश प्राप्त झाला.

हा संदेश मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता संबंधित बँकेच्या टोल-फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधला. बँकेने तातडीने तपास केल्यानंतर त्यांच्या परवानगीशिवाय क्रेडिट कार्डचा वापर करून चार वेगवेगळे मोठे व्यवहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पुढील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बँकेने तत्काळ संबंधित क्रेडिट कार्ड ब्लॉक केले.

कीर्ती कुल्हारी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केले की, त्यांच्या क्रेडिट कार्डचा पासवर्ड पूर्णपणे गोपनीय होता आणि तो त्यांनी कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर केलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये मालवेअर किंवा स्पायवेअरद्वारे घुसखोरी करून कार्डची माहिती चोरली गेली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आंबोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सायबर सेलचे विशेष पथक बँकेचे रेफरन्स क्रमांक, व्यवहारांचे डिजिटल लॉग, आयपी अ‍ॅड्रेस, डिव्हाइस ट्रेल आणि इतर डिजिटल फूटप्रिंट्सच्या आधारे आरोपींचा माग काढत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat