Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Kukadi Project: शेतकर्‍यांना दिलासा! कुकडी प्रकल्पात ७१% पेक्षा जास्त पाणी; डिंभे अन् येडगाव धरण फुल्ल

Kukadi Project: शेतकर्‍यांना दिलासा! कुकडी प्रकल्पात ७१% पेक्षा जास्त पाणी; डिंभे अन् येडगाव धरण फुल्ल

प्रभात 2 months ago

Kukadi Project - कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे प्रकल्पातील पाच प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारच्या अहवालानुसार कुकडी प्रकल्पात 71.27 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असून, खरीप हंगामातील सिंचनाबाबत शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे आणि डिंभे या पाच धरणांची एकूण उपयुक्त पाणीसाठवण क्षमता सुमारे 30 टीएमसी आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा आणि श्रीगोंदा या सात तालुक्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरला असून, सुमारे दीड लाख एकर शेतीचे सिंचन या प्रकल्पावर अवलंबून आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात धरणांतील पाणीसाठ्याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून असते.

यंदा जून महिना कोरडा गेल्याने कुकडी प्रकल्पातील धरणांनी तळ गाठला होता. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे ओढे-नाले आणि भातखाचरे भरून वाहू लागले असून, धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या अहवालानुसार आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणात 90.81 टक्के, जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणात 97.63 टक्के, माणिकडोह धरणात 51.39 टक्के, वडज धरणात 83.90 टक्के आणि पिंपळगाव जोगे धरणात 43.47 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. याशिवाय चिल्हेवाडी धरणात 78.78 टक्के,

विसापूर धरणात 90.40 टक्के आणि घोड धरणात 95.35 टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. धरणांतील वाढता पाणीसाठा लक्षात घेऊन सुरक्षितता आणि नियंत्रित जलपातळी राखण्यासाठी डिंभेसह संबंधित धरणांच्या दरवाज्यांतून नदीपात्रात नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat