Wednesday, 15 Sep, 9.08 am प्रभात

ताज्या बातम्या
लक्षवेधी : तोट्याचा व्यवहार

- हेमंत महाजन

ज्या देशाचे मंत्रिमंडळ हे दहशतवादी आणि उग्रवादी यामुळे भरलेले आहे, त्या देशात जगातील कुठला देश आर्थिक गुंतवणूक करण्यास इच्छुक असेल?

पाकिस्तानी सैन्य, सरकार आणि पाक आम जनता सध्या अत्यंत खूश आहे, कारण तालिबानचा विजय हा कडव्या/उग्रवादाचा पाश्‍चिमात्य देशावरील सर्वात मोठा विजय मानला जात आहे. काही सामारिक तज्ज्ञांना वाटते की तालिबानच्या मदतीमुळे पाकिस्तानला काश्‍मीरमध्येही विजय मिळू शकतो.

आर्थिक किंमत शून्य
खरे म्हटले तर तालिबानमुळे पाकिस्तानला नुकसान जास्त आणि फायदे कमी आहेत. पाकिस्तान आता अफगाणिस्तान नावाच्या अत्यंत खोल विवरात फसला आहे. कारण अफगाणिस्तानची आर्थिक किंमत शून्य आहे. तिथे बहुसंख्य लोक अशिक्षित आहेत. ते जाती-जमातींमध्ये वाटले गेले आहे. वेगवेगळे वॉर लॉर्डस, तिथे गेले शेकडो वर्षे राज्य करीत आहेत. अफगाणिस्तान एक देश म्हणून कधीही राहू शकला नाही.

सामरिक महत्त्व विनाकारण वाढवले
अफगाणिस्तान एक समुद्रकिनारा नसलेला देश आहे. त्यांची अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त झालेली आहे. येथे कुठल्याही प्रकारचे औद्योगिक कारखाने, विकसित झालेली शेती, सर्व्हिसेस सेक्‍टर नाही. कोरडे पर्वत, नापीक जमीन, अत्यंत थंड हवामान असलेला हा देश आहे. काही तथाकथित तज्ज्ञांनी अफगाणिस्तानचे सामरिक महत्त्व विनाकारण वाढवले आहे.

ते सांगण्याचा प्रयत्न करतात की तिथली अफाट नैसर्गिक संपत्तीवर चीन डल्ला मारण्याचा प्रयत्न करेल. जे अमेरिका आणि रशियाला तीस वर्षांत जमले नाही, ते चीनला किती जमेल, हे केवळ येणारा काळच सांगू शकेल. परंतु चीनला मोठे यश मिळण्याची शक्‍यता अतिशय कमी आहे.

सगळ्याच बाबतीत, मग आर्थिक बाब असो की, लोकसंख्या जीवनमान, शिक्षण, मानवी विकास, आरोग्य, महिला कल्याण, संस्कृती आणि मनोरंजन, व्यापार, उद्योग असो अफगाणिस्तानची परिस्थिती जगात सर्वात वाईट आहे. अफगाणिस्तानमध्ये येणाऱ्या काळात अराजकता आणि हिंसाचार वाढण्याची शक्‍यता आहे आणि यामुळे जनतेचे लोंढे शेजारच्या राष्ट्रांमध्ये खास तर पाकिस्तानमध्ये जाण्याची शक्‍यता आहे.

अफगाणिस्तानचे हक्‍कानी नेटवर्क सर्वात ताकदवान आहे. त्यांना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये असलेली सीमा ज्याला ड्युरंड लाइन असे म्हटले जाते ती मान्य नाही. तालिबानचे आणि वेगवेगळ्या दहशतवाद्यांचे शेकडो स्लीपर सेल हे पाकिस्तानमध्ये अगोदरच तयार झालेले आहेत.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानशी संबंध प्रस्थापित करून नेमके काय हासील होईल? अफगाणिस्तानला केवळ मदतीची गरज आहे. अफगाणिस्तान एक दुर्दैवी राष्ट्र आहे, ज्यांच्या नशिबी केवळ युद्ध आणि हिंसाचार एवढाच आला आहे. येणाऱ्या काळामध्ये काही फारसा बदल होईल असे वाटत नाही. म्हणूनच पाकिस्तानला अफगाणिस्तानशी घनिष्ठ मैत्री करून फारसा फायदा होईल अशी आशा नाही.

तालिबानला पाकिस्तानची गरज नाही
पाकिस्तान आणि तालिबान यांच्या नात्यांमध्ये वेगाने बदल होत आहे कारण आता तालिबानला पाकिस्तानशी गरज राहिलेली नाही. लढाई संपलेली आहे आणि आता अफगाणिस्तानला पाकिस्तानमध्ये असलेल्या त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅम्पची गरज नाही. त्यांना आता पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात लपण्याची गरज नाही. अमेरिकेने त्यांच्याकरता एवढी शस्त्रे सोडली आहेत की आता पाकिस्तानकडून मिळणाऱ्या शस्त्रांची गरज नाही.

यामुळे पाकिस्तान आता तालिबानवर आपला कंट्रोल कसा ठेवायचा, हे मोठे आव्हान आहे. पाकिस्तानला सर्वात महत्त्वाचे आहे की, तालिबान सरकारच्या मदतीने तेहरिके तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी गटावर पूर्णपणे कंट्रोल करून त्यांना पाकिस्तानच्या विरोधात कारवाया करण्यापासून थांबवायचे. टीटीपीमुळे पाकिस्तानला दहशतवादापासूनचा सर्वात मोठा धोका आहे. या दहशतवादी गटाचे कॅम्पस आणि नेतृत्व हे अफगाणिस्तानमध्ये आहे.

हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला
2007 ते 2014 या कालखंडामध्ये टीटीपीने पाकिस्तानमध्ये प्रचंड हिंसाचार घडवून आणला होता. 2014 नंतर पाकिस्तानी सैन्याने टीटीपीच्या विरुद्ध दहशतवादी विरोधी अभियान सुरू केले. यामुळे टीटीपीचे नुकसान झाले आणि त्यांची दहशतवादाची क्षमता 50 टक्‍क्‍यांनी कमी झाली. उरलेले दहशतवादी पळून अफगाणिस्तानमध्ये गेले; परंतु आता तालिबानला मिळालेल्या यशामुळे टीटीपीचे मनोबल वाढले आहे.

याशिवाय गेल्या काही महिन्यांमध्ये टीटीपीच्या नेतृत्वाने त्यांच्या वेगळे झालेल्या आणि तुटलेल्या इतर लहान गटांना एकत्र आणून टीटीपीला पुन्हा सशक्‍त बनवलेले आहे. यामुळे या गटाची क्षमता लक्षणीयरित्या वाढली आहे आणि यामुळेच त्यांनी आता पाकिस्तानमध्ये हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढवला आहे.

ऑगस्टच्या महिन्यामध्ये टीटीपीने पाकिस्तानात 32 दहशतवादी हल्ले केले. 5 सप्टेंबरला केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी पॅरामिलिटरी फोर्सचे तीन जवान मारले गेले. म्हणूनच पाकिस्तानला टीटीपीच्या हिंसाचाराला थांबायचे आहे. परंतु पाकिस्तानच्या या गरजेकडे तालिबानने दुर्लक्ष केलेले आहे, कारण त्यांच्या दृष्टीने पाकिस्तान आणि टीटीपी यामध्ये टीटीपी जास्त महत्त्वाची आहे.

कारण, तालिबानला सत्ता मिळण्यामध्ये टीटीपीचा मोठा वाटा होता. पंजशीरमध्ये तालिबानला मदत करताना पाकिस्तानी सैन्याला मोठी हानी पत्करावी लागली. या लढाईत त्यांचे 7 ऑफिसर्स 12 जेसीओ आणि 75 जवान मारले गेले. मात्र हे सगळं जगापासून आणि पाकिस्तानच्या नागरिकांपासून लपवण्या करता पाकिस्तानी सैनिकांना कारगिलप्रमाणे तिथेच दफन केले.

यापूर्वी पाकिस्तानचे डीजी आयएसआय लपून अफगाणिस्तानच्या चकरा मारायचे. परंतु आता अफगाणिस्तान संकटामध्ये ते सर्वात महत्त्वाचे घटक आहे, हे जगाला दाखवण्याकरता डीजी आयएसआय उघडपणे अफगाणिस्तानमध्ये चकरा मारत आहेत.

मात्र, यामुळे पाकिस्तानी सैन्यात मतभेद निर्माण झाले आहे आणि डीजी आयएसआयला पाकिस्तानच्या सेना प्रमुखाकडून समज देण्यात आली आहे. कारण येत्या ऑक्‍टोबरमध्ये फायनान्शिअल ऍक्‍शन टास्क फोर्सची एक बैठक आहे. फोर्सने पाकिस्तानला दहशतवादाला समर्थन देणारा देश म्हणून ग्रे लिस्टमध्ये ठेवले आहे. आता पाकिस्तानचे काय करायचे यावर पुन्हा एकदा विचार केला जाईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top