LSG vs DC Sanjiv Goenka Rishabh Pant Conversation Video Viral : आयपीएल २०२६ च्या आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सच्या गोटात चिंतेचे आणि तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
सामन्याच्या निकालानंतर मैदानातच संघ मालक संजीव गोयंका, कर्णधार ऋषभ पंत आणि मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्यात झालेली गंभीर चर्चा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर इकाना स्टेडियमवर जे दृश्य पाहायला मिळाले, त्याने जुन्या आठवणी ताज्या केल्या. संघ मालक संजीव गोयंका यांनी मैदानातच कर्णधार ऋषभ पंत आणि प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना घेरले. गोयंका या दोघांना काहीतरी गंभीरपणे समजावून सांगताना आणि जाब विचारताना दिसले, तर पंत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यापूर्वी केएल राहुलसोबत घडलेल्या अशाच प्रकारच्या वादाची आठवण करून दिली आहे.
जुन्या वादाची पुनरावृत्ती?
काही वर्षांपूर्वी एका सामन्यातील पराभवानंतर संजीव गोयंका यांनी तत्कालीन कर्णधार केएल राहुलला मैदानावरच सर्वांसमोर झापले होते. त्या घटनेनंतर राहुलने अखेर लखनौची साथ सोडली होती. आता ऋषभ पंतसोबतही सुरुवातीच्याच सामन्यात अशाच प्रकारची ‘गंभीर चर्चा’ झाल्याने लखनऊच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
समीर रिझवीच्या फटकेबाजीने फिरवला सामना
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, लखनौने दिलेले १४२ धावांचे आव्हान दिल्लीने सहज पूर्ण केले. दिल्लीची सुरुवात ४ बाद २६ अशी खराब झाली होती, मात्र समीर रिझवी (नाबाद ७०) आणि ट्रिस्टन स्टब्स (नाबाद ३९) यांनी पाचव्या विकेटसाठी ११९ धावांची विक्रमी भागीदारी रचली. रिझवीच्या स्फोटक खेळीमुळे दिल्लीने १७.१ षटकातच विजय मिळवला. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर लखनौ अपयशी ठरल्यानेच मालक गोयंका यांचा पारा चढल्याचे बोलले जात आहे.

