Dailyhunt
LSG vs DC : क्रिकेटचा थरार की हाणामारीचा आखाडा? लाइव्ह सामन्यात चाहत्यांमध्ये तुफान राडा; लाथाबुक्क्यांनी एकमेकांना तुडवलं!

LSG vs DC : क्रिकेटचा थरार की हाणामारीचा आखाडा? लाइव्ह सामन्यात चाहत्यांमध्ये तुफान राडा; लाथाबुक्क्यांनी एकमेकांना तुडवलं!

प्रभात 2 weeks ago

LSG vs DC Ekana Stadium Fan Fight Video Viral : लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर १ एप्रिल २०२६ रोजी खेळल्या गेलेल्या लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) सामन्याला हिंसक गालबोट लागले आहे.

मैदानात खेळाडूंचा थरार सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमध्ये चाहत्यांमध्ये जोरदार राडा झाला, ज्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आयपीएल २०२६ चा पाचवा सामना मैदानातील कामगिरीपेक्षा प्रेक्षक गॅलरीतील राड्यामुळे जास्त चर्चेत आला आहे. सामन्याच्या उत्तरार्धात प्रेक्षकांच्या एका स्टँडमध्ये दोन गटांत किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली. या वादाचे रूपांतर काही क्षणांतच भीषण हाणामारीत झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण एकमेकांचे कपडे ओढताना, शिवीगाळ करताना आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करताना दिसत आहेत.

पोलीस अधिकाऱ्याचे धाडस –

स्टेडियममधील हा गोंधळ पाहून आजूबाजूला बसलेल्या कुटुंबांमध्ये आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तिथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. एका धाडसी पोलीस अधिकाऱ्याने या वादात पडत दोन्ही गटांना एकमेकांपासून वेगळे केले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या राड्यामुळे काही काळ मैदानातील खेळावरून प्रेक्षकांचे लक्ष विचलित झाले होते. या प्रकरणी दोषींवर नेमकी काय कारवाई झाली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

– LSG vs DC : समीर रिझवीची इम्पॅक्टफुल इनिंग! अन् दिल्लीचा लखनौवर ऐतिहासिक विजय; सलग पाचव्यांदा LSG ला चारली धूळ

मैदानावर दिल्लीचा ‘इम्पॅक्ट’ विजय –

एकीकडे स्टँड्समध्ये राडा सुरू असताना, मैदानावर दिल्ली कॅपिटल्सने लखनौवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. लखनौने दिलेले १४२ धावांचे आव्हान दिल्लीने १९ चेंडू राखून पूर्ण केले. दिल्लीच्या विजयाचा खरा नायक ठरला तो म्हणजे समीर रिझवी. रिझवीने ४७ चेंडूत नाबाद ७० धावांची तुफानी खेळी केली, तर ट्रिस्टन स्टब्सने त्याला नाबाद ३९ धावांची साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ११९ धावांची अभेद्य भागीदारी रचत दिल्लीला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat