Sunday, 17 Jan, 9.03 am प्रभात

मुख्य बातम्या
.मग टोकियोत काय होणार ?

भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू थायलंड ओपन सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झाली. 'अपेक्षेप्रमाणे' हा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे गेल्या दोन मोसमात सिंधूने अशीच सुमार कामगिरी केली आहे. असेच जर अपयशी सातत्य असेल तर मग यंदा होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक कसे मिळणार, हा प्रश्‍न निर्माण होत आहे.

फुलराणी सायना नेहवाल आणि सिंधू यांनी एकेकाळी जपान, थायलंड, चीन, इंडोनेशिया, कोरिया या देशांचे जागतिक बॅडमिंटनमधील वर्चस्व मोडून काढले होते. सायनापाठोपाठ सिंधूनेही ऑलिम्पिक पदकाला गवसणी घातली होती. मात्र, या इतिहासाच्या जोरावर आणखी किती काळ पोट भरणार. भारतीय क्रिकेट संघात जसे पूर्वपुण्याईवर अनेक खेळाडू जागा अडवून बसलेले पाहायला मिळतात त्याचप्रमाणे बॅडमिंटनमध्येही या दोघींव्यतिरिक्‍त कोणाकडेच गुणवत्ता नाही असा विचार रुजलेला दिसतो.

सायना व सिंधू यांना या महिन्यात थायलंडमध्ये सलग तीन स्पर्धा खेळायच्या आहेत. त्यातील पहिल्या स्पर्धेत तर दरवर्षीप्रमाणे पराभवाची सलामी दिली. मग असे वाटते की जर अशी कामगिरी असेल तर त्यासाठी परदेशात सराव करण्यासाठी जाण्याची गरजच काय?
सिंधू गेले काही महिने इंग्लंडमध्ये अत्याधुनिक सराव करत होती.

एकीकडे करोनाचा धोका असताना तिने आपल्या फिजीओला तसेच प्रशिक्षकांना आपल्या सरावादरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती. त्यावर बराच काळ बुद्धिबळ झाल्यानंतर ही परवानगी देण्यात आली. या आठवड्यात सिंधूला थायलंड स्पर्धेच्या सलामीच्याच सामन्यात डेन्मार्कच्या मिया ब्लिछफिल्डकडून 21-16, 24-26 व 13-21 असा तीन गेममध्ये पराभव पत्करावा लागला. तिच्यासह बी. साईप्रणितलाही पराभवाचा सामना करावा लागला. गाजावाजा करत हे खेळाडू विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात, मग त्यांना कधी पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीच्यापुढे का जाता येत नाही? नक्‍की कुठे आणि काय चुकतं आहे.

दरवर्षी सायना किंवा सिंधू 'आम्ही ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले असल्याचे' वक्‍तव्य करतात व पहिल्याच फेरीत गारद होऊन मायदेशी परततात. दरवर्षी सातत्याने होत असलेल्या स्पर्धा, परदेशी फिजीओ, गोपीचंदसारखा प्रसिद्ध प्रशिक्षक, अत्याधुनिक सुविधा, स्पर्धेसाठी गेल्यावर राहण्यासाठी तारांकित हॉटेल्स, फिरण्यासाठी गाड्या, लॅव्हिश जीवनशैली हे सगळे असूनही सातत्याने अपयश का येते, याचा खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांनीही अभ्यास करण्याची गरज आहे.

कारण ही अशी सुमार कामगिरी करून टोकियोत पदक मिळणार नाही. लाखो रुपयांचा खर्च, भरमसाठ रकमेचे करार असलेली प्रायोजकांची भक्‍कम साथ, असे असूनही प्रत्यक्ष कोर्टवर येत असलेले अपयश आपल्याला ऑलिम्पिकचे पदक लांबच राष्ट्रीय स्पर्धेतही यश मिळवून देणार नाही. जर खरेच सिंधूला किंवा सायनाला टोकियोत पदक मिळवायचे असेल तर त्यापूर्वी होत असलेल्या सगळ्याच स्पर्धांमध्ये प्रत्येक सामना ऑलिम्पिक स्पर्धेतील अंतिम सामनाच आहे, इतका गांभीर्याने विचार करून खेळले पाहिजे. पण त्यासाठी जिद्द, मेहनत घेण्याची तयारी, कसून सराव, दुखापतींपासून लांब राहण्यासाठी फिटनेसवर भर व सकारात्मक मानसिकता यांची गरज आहे. जेव्हा हीच धारणा घेऊन हे खेळाडू कोर्टवर उतरतील तेव्हाच ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा करण्यात अर्थ आहे.

अमित डोंगरे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top