Tuesday, 17 Sep, 8.55 am प्रभात

मुख्य पान
महापालिका भवनात आंदोलनास मज्जाव

हिरवळीवरच परवानगी असणार : पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय

पुणे - पुणे महापालिका भवनात येऊन आता आंदोलन करता येणार नाही; तर तेथील हिरवळीवर करण्याला परवानगी असेल, असे महापौर मुक्‍ता टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. याबाबत पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिक, विविध संस्था, राजकिय पक्ष आणि कामगार संघटना विविध मागण्यांसाठी पालिका इमारतीत येऊन आंदोलन करतात. बरेचदा हे आंदोलन शिवाजीनगर येथील मुख्य कार्यालयासमोरील रस्त्यावर होतात. तसेच अलीकडे विस्तारीत इमारतीमध्ये मुख्य सभेच्यावेळी सभागृहाबाहेरही आंदोलन केले जाते. अगदी सभागृहाच्या आवारातच घोषणाबाजी होत असल्याने कामकाजावर त्याचा परिणाम होतो. याशिवाय आंदोलक आक्रमक झाले तर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही होते, असे महापौर म्हणाल्या.

या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्यसभेच्या आंदोलकांना महापालिका भवन समोरील हिरवळीवर आंदोलनाची परवानगी देण्यात यावी, यावर सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षाच्या नेत्यांचे आजच्या बैठकीमध्ये एकमत झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका भवनमध्ये येणाऱ्या नागरिकांना ओळखपत्र अनिवार्य करणे तसेच अन्यबाबींवरही सोमवारी चर्चा झाल्याचे महपौरांनी सांगितले. याशिवाय आदर्श व्यक्‍तिमत्वांची तैलचित्र अथवा पुतळे उड्डाणपुलांखाली बसवू नयेत, यावरही पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये एकमत झाले. तसेच जलयुक्‍त शहर अभियान आणि रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यासाठी समिती गठीत करण्याचे अधिकार महापौरांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top