Thursday, 17 Oct, 1.00 am प्रभात

शीर्ष बातम्या
महेश लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे भोसरीचा विकास - आढळराव-पाटील

पिंपरी - भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे मागील पाच वर्षांत भोसरी परिसरात अनेक समाजोपयोगी विकास प्रकल्प विकसित करण्यात आले. त्यांचा 'भोसरी व्हिजन 20-20′ हा संकल्प शहराला आणखी वेगाने विकसित करणारा ठरेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. माजी खासदार आढळराव म्हणाले की, उद्योग व्यवसायासाठी देशभरातून कामगार पिंपरी चिंचवडला स्थायिक होण्यासाठी येतात. त्यामुळे शहराचा नागरीकरणामध्ये देशात पहिल्या पाचमध्ये क्रमांक आहे. वाढत्या नागरीकरणाच्या गरजा भागविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा 'भोसरी व्हिजन 20-20′ हा संकल्प शहराला निश्‍चितच लाभदायी ठरेल.

आमदार महेश लांडगे यांनी भोसरीच्या विकासाचे स्वप्न पाहत हाती घेतलेला इंद्रायणी सुधार प्रकल्प, नाशिक फाटा ते चाकण, पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्प, मल्टीमोडल हब, वेस्ट टू एनर्जी, देहू आळंदी पुणे पालखी महामार्ग, संविधान भवन, संतपीठ, सफारी पार्क, भक्ती-शक्ती चौकातील तीन मजली उड्डाणपूल, स्पोर्टस सिटीच्या दृष्टीने इंद्रायणीनगर, गवळीनगर, भोसरी गावजत्रा मैदान, मोशी चिखली प्राधिकरण, भोसरी एमआयडीसी येथे विकसित केलेले क्रीडा प्रकल्प, सफारी पार्क, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र व स्मार्ट सिटीच्या दृष्टीने त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे.

आंद्रा-भामा-आसखेड पाणी पुरवठा योजना अशा अनेक योजनांची आठवण माजी खासदार आढळराव पाटील यांनी करून दिली. इंद्रायणी थडीच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, परिवर्तन हेल्पलाईनच्या उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक अल्पावधीत होत आहे. विकासाचे ध्येय बाळगणाऱ्या लांडगे यांना विजयी करावे, असे आवाहन माजी खासदार आढळराव-पाटील यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top