शिवाजीनगर मुख्यालयातील प्रकार
पुणे - शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. सायबर पोलीस ठाण्यातील फ्री स्टाईल मारामारीनंतर पोलीस मुख्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
ड्युटी ऑफिसर मदतनीस असलेल्या पोलीस शिपाई महिलेने थेट पोलीस नाईक महिलेला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. मारहाणीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हाणामारीत जखमी झालेल्या पोलीस नाईक महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळी संबंधित पोलीस नाईक महिला ड्युटी ऑफिसर असलेल्या मदतीस महिला शिपायाकडे गेली होती. ड्युटीसंदर्भात दोघींमध्ये शाब्दिक वादावादीतून शिवीगाळ करण्यात आली.
दरम्यान, आर्थिंक कारणावरून ही घटना घडल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. याविषयी पोलीस उपायुक्त मीतेश घट्टे म्हणाले की, महिलांमध्ये झालेल्या मारहाणीची खात्यातंर्गत चौकशी करुन शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही.

