Friday, 24 Sep, 12.40 pm प्रभात

ताज्या बातम्या
'महिलांवर अत्याचार व्हावेत असं रावणालाही वाटत नसेल'; मुनगंटीवारांच्या टीकेवर राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर डोंबिवली पूर्वेतील सागाव येथे एका अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी सहा महिन्यांहून अधिक काळ लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचे राजकीय पडसाद देखील उमटत आहेत. दरम्यान, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. या प्रकरणावर सरकारने दोन दिवस अधिवशेन बालावून चिंतन करावे, असे मुनगंटीवार म्हणाले.

त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सुधीर भाऊ फार संवेदनशील आहेत हे मला माहित आहे. त्यांच्या भावनांचा नक्की विचार केला जाईल. महिलांवर अत्याचार व्हावेत असं कोणत्या सरकारला वाटेल. रावणालाही वाटत नसेल. रावणानेही सीतेवर अत्याचार केला नव्हता. सीतेला पळवून नेले पण सन्मानाने अशोकवनात ठेवलं. या भूमीची परंपरा आहे इथे आपण स्त्रियांचा सन्मान राखतो आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा नाश करतो.

महाराष्ट्रात कायम महिलांचा सन्मान राखला गेलेला आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत आपण कठोर पावलं टाकलेली आहेत हे संपूर्ण विरोधी पक्षाला माहित आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि वारसदार आहोत त्यामुळे या राज्यामध्ये महिलांचा अपमान, अत्याचार याबाबत सरकार संवदेनशील आहे,' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

'साकीनाका नंतर आता डोंबवली प्रकरण राज्याचील अत्याच्याराच्या घटना आता सांगायला सुरवात केली तर २४ तास कमी पडतील. सरकारला आमची हात जोडून विनंती आहे. तुम्ही हजार वर्ष सत्तेत राहा, तुमची सत्ता सुरक्षीत ठेवा. पण राज्यातील महिलांवर बलात्कार होत आहेत आणि राज्यात आपण या गंभीर विषयावर चर्चा करणार नाही. इतर राज्यातील घटनांच उदाहरण देऊन आपण राज्यातील घटनांकडे दुर्लक्ष करता, हे बरोबर नाही,' असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

डोंबिवलीतील पीडितेच्या प्रियकराने लैंगिक संबंधांची चित्रफीत तयार करून पीडितेला धमकावले आणि तिला आपल्या मित्रांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. हा प्रकार गेले सहा महिने सुरू होता. नांदिवली टेकडी, देसलेपाडा, रबाळे नवी मुंबई, मुरबाड येथील शेतघर, कोळे-बदलापूर रस्ता सर्कल अशा भागांत नेऊन पीडितेचा प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी हे दुष्कृत्य केले. हा सगळा प्रकार असह्य झाल्याने बुधवारी रात्री पीडितेने पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून ३० जणांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top