Sunday, 09 May, 7.17 pm प्रभात

मुख्य बातम्या
मल्लिकार्जुन खरगेंचेही मोदींना पत्र; लसीसाठी तरतूद केलेले 35 हजार कोटी रुपयांचा वापर करण्याचा दिला सल्ला

नवी दिल्ली, दि. 9 - देशातील कोविड नियंत्रणाच्या संबंधात राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांना सहा सूचना केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, लसीकरणाचा सध्या देशभर घोळ सुरू आहे. तथापि याच सरकारने कोविड लसीकरणासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ती तरतूद त्यांनी त्वरित वापरात आणली पाहिजे.

कोविडशी संबंधीत वस्तुंवरही मोठ्याप्रमाणात करवसुली सुरू आहे ती त्वरित थांबवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्या लसींवर पाच टक्‍के दराने जीएसटी वसूल केला जात आहे. पीपीई किटवरही पाच ते बारा टक्के दराने जीएसटी लावला जात आहे. रुग्णवाहिकांवर तब्बल 28 टक्के आणि ऑक्‍सिजन कॉन्सनट्रेटरवर 12 टक्‍के दराने जीएसटी लावला जात आहे तो त्वरित रद्द केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या विदेशातून मोठ्या प्रमाणात मदत सामग्री येत आहे ती सामग्री त्वरीत राज्यांना वितरीत करणारी यंत्रणा स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी मोदी सरकारला केली आहे.

सध्या केंद्र सरकारने आपली करोनाविषयक जबाबदारीच सोडून दिल्यासारखी स्थिती असून त्यामुळे आता संपुर्ण देशातील स्वयंसेवी संस्था, नागरीकांचे गट आणि सिव्हील सोसायटीचे सभासदच हा लढा त्यांच्या परीने लढत आहेत. करोना विरूद्धच्या लढाईसाठी एकसमान धोरण ठरवून त्वरीत उपाययोजना करण्यासाठी मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि विरोधकांचीही यासाठी मदत घ्यावी, अशी सूचनाही खरगे यांनी केली आहे.

करोनामुळे आर्थिक पेचप्रसंग बिकट बनला असून लोकांना आता आपल्या घरातील वस्तू, दागिने आणि जमिनी विकून पैसा उभा करावा लागत आहे हेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले असून मनरेगा अंतर्गत सध्या जो शंभर दिवस रोजगार दिला जातो त्याचे प्रमाण दोनशे दिवस इतके करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top