Monday, 13 Jul, 4.56 pm प्रभात

ताज्या बातम्या
मॅंचेस्टर सीटीचा ब्रायटनवर शानदार विजय

इंग्लिश प्रीमिअर लीग : स्टर्लिंगची हॅट्ट्रिक

लंडन - इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत मॅंचेस्टर सीटीने ब्रायटनचा 5-0 असा धुव्वा उडवला. या सामन्यात रहिम स्टर्लिंग याने हॅट्ट्रिक नोंदवताना ब्रायटनच्या गोलकीपरच्या मर्यादाच उघड्या पाडल्या.

मॅंचेस्टर संघाने वर्चस्व राखले. स्टर्लिंगने 21 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर गॅब्रियल जीजसने 44 व्या मिनिटाला गोल केला व आघाडी वाढवली. स्टर्लिंगने त्यानंतर लगेचच 53 व्या मिनिटाला गोल केला व सामन्यातील आपला दुसरा गोल नोंदवला. बर्नाड सिल्वा याने 56 व्या मिनिटाला गोल करत संघाला 4-0 अशी आघाडी प्राप्त करून दिली.

या सामन्यात ब्रायटनचा बचाव अत्यंत कमकुवत ठरला. एखाद्या क्‍लब संघाच्या दर्जाप्रमाणे त्यांचा गोलकीपर अपयशी ठरत होता. सामना संपण्यास काही अवधी असताना स्टर्लिंगने 81 व्या मिनिटाला सामन्यातील वैयक्तिक तिसरा गोल केला व सघाला 5-0 अशी बलाढ्य स्थिती प्राप्त करून दिली. स्टर्लिंगने नोंदवलेली ही पहिलीच हॅट्ट्रिक ठरली.

मॅंचेस्टर सीटीने गेल्या 7 सामन्यांतून 23 गोल नोंदवले आहेत. करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा सुरुवातीचे काही सामने झाल्यावर थांबविण्यात आली होती. दोन आठवड्यांपूर्वीच स्पर्धा पुन्हा सुरू झाली. या विजयाच्या जोरावर मॅंचेस्टर सीटीने या स्पर्धेत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले.

या तालिकेत लिव्हरपूल 93 गुणांसह आघाडीवर असून मॅंचेस्टर सीटीचे आता 72 गुण झाले आहेत. स्पर्धेत आता पुढील सामने त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून गुणांतील फरक काढून टाकण्यात मॅंचेस्टर सीटीला यश आले तर ते लिव्हरपूल संघासमोर विजेतेपदासाठी मोठे आव्हान निर्माण करू शकतील.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top