Thursday, 19 Sep, 3.01 am प्रभात

शीर्ष बातम्या
मराठवाड्यात जलसंकट

1 ऑक्‍टोबरपासून मांजरा धरणातून होणारा पाणी पुरवठा बंद
लातूर : राज्यात एकीकडे मुसळधार पावसामुळे पूरस्थितीने थैमान घातलेले असताना दुसरीकडे मराठवाड्यात पावसाने अद्यापही पाठ केल्याने येथील ऐन पावसाळ्यातही पाणीसंकट गडद आहे. अंबाजोगाई शहरासह बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना करण्यात येणारा पाणी पुरवठा येत्या 1 ऑक्‍टोबरपासून बंद करण्यात येणार आहे. मांजरा धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्वच योजनांचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी घेतला आहे.

टॅंकरद्वारे प्रत्येक घरी केवळ 200 लिटर पाणी
मराठवाड्यातील पाणी संकट लक्षात घेत अडचणींवर मात करण्यासाठी मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणारे लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धरणातून होणारा पाणी पुरवठा 1 ऑक्‍टोबरपासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. यापुढे प्रत्येक घरी केवळ 200 लिटर पाणी टॅंकरद्वारे पुरवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. लातूर महानगरपालिकेने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे शहरातील लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी 600 टॅंकरचे नियोजन केले आहे. शहरातील गरजेनुसार यामध्ये वाढ करण्यात येईल, असे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले .

मांजरा धरणातून बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षापासून मांजरा धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. या धरणातून लातूर, अंबाजोगाईसारख्या मोठ्या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, यावर्षी पावसाळा संपत आला तरी धरणक्षेत्रात पाण्याचा एक थेंबही जमा झालेला नाही. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेला सर्वच पाणी पुरवठा अडचणीत आला आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top