Monday, 21 Oct, 8.37 am प्रभात

मुखपृष्ठ
मतदान करा, राष्ट्र घडवा

पुणेकरांनो, निर्भयपणे करा मतदान

पुणे - विधानसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. मतदार करणे सोयीचे व्हावे, यासाठी तळमजल्यावर मतदान केंद्र स्थलांतरीत करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

शहरात 114 केंद्र संवेदनशील
जिल्ह्यात एकूण 252 मतदान केंद्र संवेदनशील असून याठिकाणी 415 सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात एकूण 114 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. याठिकाणच्या मतदान केद्रांवर वेबकास्टिंग केले जाणार असून यावर लक्ष ठेवले जाणार आहे. याठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त असणार आहे. हे सूक्ष्म निरिक्षक मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल निवडणूक निरीक्षकांना पाठविणार आहे.

मतदानासाठी मदतक्रमांक जाहीर
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी (सोमवारी) मतदांना काही अडचणी आल्यास मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार मदत केंद्र स्थापन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात हे केंद्र सुरू आहे. सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान करण्याचे आवाहन या केंद्रावरून नागरिकांना केले जाणार आहे. या मदत केंद्रावर संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले असून या क्रमांकावर संपर्क साधून मतदार आपल्या समस्यांचे निराकरण करू शकणार आहेत. दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
020-26121231, 26121259, 26121263, 26121264, 26121267, 26121268, 26121269, 26121271, 26121272, 26121273, 26121274, 26121275, 26121279, 26121281, 26121291.

यादीत ऑनलाइन शोधा नाव
मतदार यादीत नाव आहे का हे तपासण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्होटर हेल्पलाईन या ऍपद्वारे मतदार यादीमध्ये नाव व मतदान केंद्र शोधता येणार आहे. त्याचबरोबर www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही नाव शोधता येणार आहे. मतदारांना कोणतीही माहिती हवी असल्या 1950 हा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

शहरातील 728 मतदान केंद्रांमध्ये बदल
मतदारांना मतदान करणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी अधिकाधिक मतदान केंद्र ही तळमजल्यावर स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील 1 हजार 187 मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे. काही मतदान केंद्रांसाठी तात्पुरते शेड उभारण्यात आली आहेत. तात्पुरती मतदान केंद्रांची संख्या 283 इतकी आहे. शहरातील 728 मतदान केंद्रांमध्ये बदल केला असून यामध्ये कसबा पेठ मतदारसंघात 27 मतदान केंद्र, हडपसरमध्ये 136, पर्वतीमध्ये 91 , खडकवासला 140, कोथरुडमध्ये 141, शिवाजीनगरमध्ये 98 आणि वडगावशेरीमध्ये 175 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी फोटो व्होटर स्लीपवर मॅप छापण्यात आला आहे. त्याचबरोबर गुगल मॅपमध्ये सर्व मतदान केंद्रे टॅग करण्यात आली आहे. त्यामुळे मतदान केंद्र शोधणे सोयीचे होणार आहे.

21 सखी मतदान केंद्र
स्त्री-पुरुष समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांचा अधिकाधिक सकारात्मक सहभाग वाढावा, या हेतूने खास महिलांसाठी महिलांकडून नियंत्रण करणारी जिल्ह्यात 21 सखी मतदान केंद्र स्थापन केली आहेत. या केंद्रांमध्ये पोलीस, ते निवडणूक कार्यावरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच महिला असणार आहेत. हे केंद्र अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे.

15 अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध
मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी मतदान केंद्रांवर अत्यावश्‍यक सुविधा असणार आहेत. यामध्ये मेडिकल किट, मतदान केंद्रांवर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, अंध आणि दिव्यांग मतदारांच्या वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन या सुविधा देण्यात येणार आहेत. यापूर्वी रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजेची उपलब्धता, मदतकक्ष, स्वच्छतागृहांची सुविधा या अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यावर्षी त्यामध्ये दुपटीने वाढ करून 15 प्रकारच्या अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरसुद्धा केंद्रावर असणार आहे.

प्रत्येकाने मतदान करणे महत्त्वाचे
विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकांना मतदान करण्याची संधी मिळते. हे पवित्र कर्तव्य म्हणून सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभाग व्हावे, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले. प्रत्येक पाच वर्षांनी मतदारांना मतदान करण्याची एक संधी मिळत असते. यंत्रणेत सुधारणा घडविण्यासाठी मतदान करणे महत्त्वाचे आहे. देशाचा जबाबदार नागरिक या नात्याने प्रत्येकाने मतदान करणे तितकेच महत्त्वाचे आहे, असेही कुलगुरू डॉ. करमळकर यांनी दै. 'प्रभात'शी बोलताना म्हटले.

'आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान'. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने पाऊस असला, तरी मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे. पुणे जिल्हा राज्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी मतदान करून जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवावी.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी पुणे


राज्यघटनेने आपल्याला मतदान हा सर्वांत मौल्यवान हक्क दिला आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. पावसाचे वातावरण जरी असले, तरी मतदान करावे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र तळमजल्यावर स्थापन करण्यात आली आहे. मतदान ओळखपत्र नसेल, तरी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या इतर ओळखपत्राच्या आधारे मतदार मतदान करू शकतात.
- डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त पुणे


विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकांना मतदान करण्याची संधी मिळते. हे पवित्र कर्तव्य म्हणून सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभाग व्हावे. प्रत्येक पाच वर्षांनी मतदारांना मतदान करण्याची एक संधी मिळत असते. यंत्रणेत सुधारणा घडविण्यासाठी मतदान करणे महत्त्वाचे आहे. देशाचा जबाबदार नागरिक या नात्याने प्रत्येकाने मतदान करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>