Wednesday, 27 Jan, 7.22 pm प्रभात

मुखपृष्ठ
.म्हणून कोसळले निर्देशांक

मुंबई - पुढील आठवड्यात अर्थसंकल्प सादर होणार असतानाच सावध गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे बुधवारी शेअर बाजार निर्देशांकात दोन टक्‍क्‍यांची घट झाली.
गेल्या चार सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 4 टक्‍क्‍यांनी म्हणजे 2,382 अंकांनी कमी झाला आहे.

बुधवारी सेन्सेक्‍स 1.94 टक्‍क्‍यांनी म्हणजे 937 अंकांनी कोसळून 47,409 अंकावर बंद झाला. चार दिवसापूर्वी सेन्सेक्‍स 50,000 अंकापर्यंत वाढला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी बुधवारी 271 अंकांनी कमी होऊन 13,967 अंकावर बंद झाला.

शेअर बाजारात वाढलेल्या विक्री बाबत बोलताना विश्‍लेषकांनी सांगितले की, एक तर अर्थसंकल्पापूर्वी बरेच गुंतवणूकदार नफा काढून घेण्याच्या मनस्थितीत आहेत. गुरुवारी मासिक फ्युचर अँड ऑप्शनीची मुदत संपणार आहे. त्यामुळेही बुधवारी गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्यास प्राधान्य दिले.

शेअर बाजारात विक्रीचा जोर इतका होता की सेन्सेक्‍ससंबंधी 30 पैकी 26 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली. ऍक्‍सिस बॅंक, टायटन, इंडसइंड बॅंक, एचडीएफसी बॅंक, डॉ.रेड्डीज, एशियन पेंटस्‌ कंपन्यांना विक्रीचा मारा करावा लागला.

चार दिवसापासून होत असलेली आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदार एकतर्फी खरेदी करीत होते. मात्र आता तेसुद्धा काही प्रमाणात विक्रीच्या मनस्थितीत आहेत. सोमवारी परदेशी संस्थागत गुंतवणुकदारांनी 765 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली असल्याची माहिती शेअर बाजारांनी दिली.

जागतिक बाजारात संमिश्र वातावरण होते. बऱ्याच कंपन्या नफादायक ताळेबंद जाहीर करूनही या कंपन्यांच्या शेअरच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. लवकरच अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यानंतर शेअर बाजार निर्देशांकांना काही प्रमाणात दिशा मिळू शकेल असे सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top