Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
MI vs SRH : रायन रिकल्टनची शतकी खेळी व्यर्थ! हेड-क्लासेनच्या वादळासमोर मुंबईचे गोलंदाज हतबल; हैदराबादचा विजयी पंच

MI vs SRH : रायन रिकल्टनची शतकी खेळी व्यर्थ! हेड-क्लासेनच्या वादळासमोर मुंबईचे गोलंदाज हतबल; हैदराबादचा विजयी पंच

प्रभात 1 month ago

MI vs SRH Sunrisers Hyderabad's fifth consecutive win : आयपीएल २०२६ मधील ४१ व्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर धावांचा महापूर पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सने आयपीएल इतिहासातील आपला सर्वोच्च धावसंख्या उभारूनही सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी हे आव्हान लीलया पेलले आणि मुंबईवर ६ गडी राखून मात केली.

यासह हैदराबादने सलग पाचवा विजय नोंदवला आहे, तर मुंबईला सहावा पराभव पत्करावा लागला.

वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २४३ धावांचा डोंगर उभा केला होता, जो त्यांच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक स्कोअर ठरला. मात्र, हैदराबादच्या फलंदाजांनी हे विशाल लक्ष्य १९ व्या षटकातच गाठून मुंबईच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. यासह हैदराबादने प्लेऑफच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, तर मुंबईच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

रिकल्टनचं ऐतिहासिक शतक ठरलं व्यर्थ –

तत्पूर्वी, मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रायन रिकल्टनने केवळ ५५ चेंडूंत १० चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद १२३ धावांची झंझावाती खेळी केली. त्याला विल जॅक्स (४६) आणि हार्दिक पंड्या (३१) यांनी चांगली साथ दिली. मात्र, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (५) पुन्हा एकदा अपयशी ठरला. मुंबईने २० षटकांत ५ बाद २४३ धावा केल्या.

– GT vs RCB : गुजरातचा बदला की आरसीबीचा दरारा! अहमदाबादमध्ये 'किंग' विरुद्ध 'प्रिन्स' आमनेसामने; पाहा दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड

हैदराबादच्या फलंदाजांचा ‘रुद्रावतार’ –

२४४ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा (४५) आणि ट्रेव्हिस हेड (७६) यांनी पॉवरप्लेमध्येच ९२ धावा कुटून मुंबईच्या गोलंदाजांची लय बिघडवली. मधल्या फळीत हेनरिक क्लासेनने नाबाद ६५ धावांची खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. सलिल अरोरानेही नाबाद ३० धावांचे मोलाचे योगदान दिले. मुंबईकडून अल्लाह गजनफरने २ विकेट्स घेतले, मात्र इतर गोलंदाजांना धावा रोखण्यात अपयश आले. हैदराबादचा हा या हंगामातील सलग पाचवा विजय असून मुंबईसाठी प्लेऑफची वाट बिकट झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat