Friday, 02 Oct, 5.05 am प्रभात

मुखपृष्ठ
मोदी आणखी एक नमस्ते ट्रम्प रॅली घेणार का?

नवी दिल्ली - भारताच्या करोनाविषयक आकडेवारीच्या विश्‍वासार्हतेवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याचा संदर्भ घेऊन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदी त्यांच्या प्रिय मित्रासाठी आणखी एक नमस्ते ट्रम्प रॅली घेणार का, असा उपहासात्मक सवाल चिदंबरम यांनी विचारला.

अमेरिकेत लवकरच अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्या प्रक्रियेचा भाग असणारा उमेदवारांचा पहिला वादविवाद मंगळवारी झाला. त्यावेळी बोलताना ट्रम्प यांनी करोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या बाधितांचा आकडा भारत, चीन आणि रशिया हे देश दडवत असल्याचा आरोप केला. त्याशिवाय, तिन्ही देशांना ट्रम्प यांनी सर्वांधिक हवा प्रदूषणाबद्दल जबाबदार धरले.

ट्रम्प आणि मोदी एकमेकांचा उल्लेख चांगले मित्र म्हणून करतात. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावेळी फेब्रुवारीत अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी नमस्ते ट्रम्प या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या सर्व बाबींचा संदर्भ देत चिदंबरम यांनी ट्‌विटरवरून मोदींवर निशाणा साधला. ट्रम्प यांनी वादविवादावेळी अमेरिकेत 47 वर्षांमध्ये झालेल्या कामापेक्षा अधिक कार्य आपण केल्याचा दावा केला. ते वक्तव्य भारतातील कुणाची आठवण करून देते का, अशी तिरकस विचारणाही चिदंबरम यांनी केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top