Sunday, 13 Oct, 3.38 am प्रभात

मुखपृष्ठ
मोदी-जिनपिंग भेटीत काश्‍मीर मुद्दाच आला नाही

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांची माहिती
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात दुसऱ्या अनौपचारिक परिषदेत काश्‍मीर मुद्दा उपस्थित झाला नाही किंवा त्यावर चर्चा झाली नाही, अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली. दोन्ही नेत्यांच्या चर्चेत काश्‍मीरचा विषय आला नाही. यावर आमची भूमिका स्पष्ट आहे. काश्‍मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे, अशी माहिती गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बैठकीत काश्‍मीर मुद्दावर चर्चा झाली होती. त्या बातम्या आम्ही पाहिल्या आहेत. काश्‍मीर मुद्यावर भारताची भूमिका स्पष्ट आहे. जम्मू-काश्‍मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. चीनला त्याची कल्पना आहे.

भारताच्या अंतर्गत विषयावर अन्य देशांनी त्यांचे मत नोंदवू नये असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार या आठवड्यात म्हणाले होते. इम्रान खान आणि जिनपिंग यांच्या बैठकीनंतर चीन आणि पाकिस्तानच्या संयुक्त निवेदनात चीनचे काश्‍मीरमधल्या परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार शांततामय मार्गाने तोडगा काढावा असे म्हटले होते.

दरम्यान, केंद्र सरकारने 5 ऑगस्टला संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर करुन जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केले होते. या निर्णयावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड गदारोळ केला. पण टर्की, मलेशिया आणि चीन वगळता पाकिस्तानला कुठल्याही देशाचा पाठिंबा मिळाला नाही. संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया प्रमुख इस्लामिक देशांनीही पाकिस्तानची साथ दिली नाही. संयुक्त राष्ट्रासह सर्वांनीच पाकिस्तानला भारतासोबत चर्चा करुन तोडगा काढण्याचे आवाहन केले. पण पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाची भाषा सुरु होती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top